उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या म्हसळा पोलिसांचा गौरव ; जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

म्हसळा - सुशील यादव
रायगड जिल्ह्यात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या म्हसळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.गुन्ह्यांची तत्परतेने उकल,कायदा व सुव्यवस्था राखणे, हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत मिळवून देणे तसेच विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.म्हसळा तालुक्यात घडलेल्या विविध गुन्ह्यांचा वेगाने छडा लावून आरोपींना अटक करण्यात म्हसळा पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. विशेषतः म्हसळा शहरातील एका व्यापाऱ्याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून आंतरराज्यीय टोळीने तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केली होती.या प्रकरणाचा काही दिवसांतच तपास पूर्ण करून संबंधित टोळीला मुद्देमालासह जेरबंद करण्याची उल्लेखनीय कामगिरी म्हसळा पोलिसांनी केली होती.या कामगिरीची दखल जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली.पोलीस दलाच्या कर्तव्यदक्षतेचे व जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक करताना जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी म्हसळा पोलिसांनी भविष्यातही अशाच प्रकारे प्रामाणिकपणे व तत्परतेने सेवा बजावावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे तसेच पोलीस कर्मचारी अक्षय पुरी,विवेक ठाकरे,सागर चितारे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या गौरवामुळे म्हसळा पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा