म्हसळा (प्रतिनिधी): म्हसळा तालुक्यातील जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य 'शिवसृष्टी' स्मारकाच्या कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी सभापती महादेव चांगु पाटील यांनी या संदर्भात थेट नगरपंचायत म्हसळाच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, काम पाडून नव्याने करण्याची मागणी केली आहे.
पहिल्याच पाहणीत पितळ उघडे!
खासदार मा. सुनीलजी तटकरे यांच्या माध्यमातून या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला होता आणि मोठ्या उत्साहात कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, नगरपंचायतीच्या इंजिनिअर सोबत केलेल्या संयुक्त पाहणीत या ऐतिहासिक स्मारकाच्या कामाची अत्यंत दुरवस्था झाल्याचे उघड झाले आहे.
तक्रार अर्जाद्वारे खालील अत्यंत गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे:
संरक्षण भिंतीला लावलेले काळे दगड इतके ठिसूळ आहेत की, त्यांना नुसता हात लावला तरी ते निखळून पडत आहेत. भिंतीच्या आत केवळ कच्चा माल (चुरा/माती) भरण्यात आल्याचा आरोप आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच 'फाउंडेशन' (पाया) अत्यंत निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे. पायात वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या थेट बाहेर दिसत असून यामुळे स्मारकाच्या मजबुतीवरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
इतर भागात झालेल्या काँक्रीटीकरणाच्या कामात सिमेंटचा योग्य वापर न करता जांभ्या दगडांचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम उरकण्यात आले आहे.
"हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून, हे चुकीचे बांधकाम तात्काळ तोडून नव्याने दर्जेदार काम करण्यात यावे. अन्यथा तालुक्यातील तमाम शिवप्रेमी कायद्याच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील!" : श्री. महादेव चांगु पाटील (माजी सभापती, पं.स. म्हासळा)
या गंभीर प्रकरणामुळे म्हसळा तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आराध्य दैवताच्या स्मारकाचे काम अशा प्रकारे बेजबाबदारपणे करणाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीने वेळीच पावले न उचलल्यास म्हासळ्यात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Post a Comment