महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल; सातबारावर नाव नसले तरी मिळणार 'स्वतंत्र ओळख प्रमाणपत्र'!

चालू अधिवेशनातच पहिल्या 'कृषी महिला शेतकरी धोरणा'ला मंजुरी मिळणार: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची म्हसळा येथील कृषी मेळाव्यात घोषणा

म्हसळा :सुशील यादव 

राज्यातील शेती क्षेत्रात अहोरात्र घाम गाळणाऱ्या महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख आणि न्याय देण्यासाठी राज्य सरकार एक क्रांतिकारी पाऊल उचलत आहे. सातबारा उताऱ्यावर नाव नसले तरीही महिला शेतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान करण्यासाठी त्यांना 'स्वतंत्र ओळख प्रमाणपत्र' दिले जाईल. यासाठीचे ऐतिहासिक 'महाराष्ट्र कृषी महिला शेतकरी धोरण' चालू विधिमंडळ अधिवेशनातच मंजूर करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तामामा यांचे विशेष आभार मानले.

 मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश शेती पुरुषांच्या नावावर असल्याने महिला प्रत्यक्षात शेतीत राबूनही त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नवीन धोरणांतर्गत खालील महत्त्वाच्या सुविधा दिल्या जातील:

 सातबारावर नाव नसले तरी महिला शेतकऱ्यांना 'महिला शेतकरी प्रमाणपत्र' देऊन त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली जाईल.

महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार असून, एक स्वतंत्र सक्षमीकरण कक्ष उभारला जाईल.

महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांची थेट मदत व मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा दाखला देत मंत्री तटकरे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय (ऑरगॅनिक) शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच, हवामान बदलांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा व इतर बागायती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या मेळाव्यात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते 'कृषी योजना माहिती पुस्तिका २०२६-२७' चे दिमाखात प्रकाशन करण्यात आले. तसेच, म्हसळा तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र व बियाणे देऊन विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंत्री तटकरे यांनी मेळाव्यातील महिला बचत गटांच्या स्टॉलना भेट देऊन त्यांच्या स्वावलंबनाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, अभिषेक विचारे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी राजू किरवे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे, संजय कर्णिक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजू किरवे यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा