​रायगड झेडपीत 'दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ'! सर्वाधिक २१ जागा जिंकूनही शिवसेना विरोधी बाकावर


 १२ मार्चला रंगणार निवडणूक
​सुनील तटकरेंच्या राजकीय खेळीने शिवसेनेच्या तीन आमदारांना धोबीपछाड; अध्यक्षपदी भाजपचाच उमेदवार बसणार हे जवळपास निश्चित
म्हसळा : सुशील यादव 

रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निकालाची धूळ खाली बसत नाही तोच, आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. येत्या गुरुवारी, १२ मार्च २०२६ रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 'नियोजन भवनात' ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने रायगडच्या राजकारणात एक मोठा राजकीय 'ट्विस्ट' पाहायला मिळत असून, सर्वाधिक २१ जागा जिंकणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाला थेट विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
​नुकत्याच लागलेल्या निकालानुसार, शिवसेना (शिंदे गट) २१ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे सत्तेचे गणित बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागा आणि भाजपने १५ जागा जिंकल्या असून, या दोन्ही पक्षांच्या एकत्रित ३१ जागांच्या बळावर रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच बसणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
​रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार - महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी असलेला वाद जिल्ह्याला नवा नाही. याच वादाचा थेट फायदा आता भाजपला झाला असून "दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" या म्हणीचा खरा अर्थ आता रायगडकरांना अनुभवायला मिळत आहे. तटकरेंनी शिवसेनेच्या तिन्ही दिग्गज नेत्यांना नमवून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची रणनीती यशस्वी केली आहे.
​निवडणूक कार्यक्रम: १२ मार्च २०२६
​रायगडचे जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) या निवडणुकीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण प्रक्रिया एकाच दिवशी पार पडणार आहे:
​उमेदवारी अर्ज भरणे: सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत (स्थळ: नियोजन भवन, अलिबाग).
​विशेष बैठक दुपारी बरोबर २:०० वाजता सुरू होईल.
​अर्जांची छाननी व घोषणा: २:०० वाजता छाननी होईल आणि त्यानंतर १० मिनिटांनी वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.
​नावांच्या घोषणेनंतर १० मिनिटांचा वेळ उमेदवारी माघारीसाठी दिला जाईल.
​आवश्यकता भासल्यास, प्रथम अध्यक्ष आणि त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेतले जाईल.
​नवनिर्वाचित सर्व सदस्यांनी १२ मार्च रोजी दुपारी २:०० वाजता या विशेष सभेसाठी उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा