म्हसळा: सुशील यादव
'ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार' या ध्येयाने प्रेरित असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे इयत्ता ८ वीच्या NMMS परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या १७ विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
सन २०२५-२६ या वर्षात विद्यालयातील एकूण १७ विद्यार्थी या प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कु. मेंदडकर जान्हवी, गुरव तनिष्का, पाटील हर्षवर्धन, दर्गे कस्तुरी, जावरे मयुरी, शिगवण श्रावणी, म्हशिलकर श्रावणी, सावंत सम्यक, जाधव संघवी, सुतार खुशी, आगरकर दिव्या, कांबळे अक्षरा, सावंत आनंद, कोरे प्रिया, दर्गे दृष्टी, कांबळे पूर्वा आणि करंबे स्वामी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे चेअरमन समीरजी बनकर यांनी भूषवले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की,
"योग्य नियोजन आणि यशाची तीव्र इच्छाशक्ती असेल तर कोणतेही ध्येय गाठणे सहज शक्य आहे. स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विकास होतो. भविष्यात या तालुक्यातून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत हीच आमची अपेक्षा आहे."
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले म्हसळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी 'आत्मविश्वास' हाच यशाचा पाया असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, "नियोजन आणि सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. मनामध्ये निश्चय केला, तर भविष्यात तुम्ही नक्कीच मोठे यश संपादन कराल."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यवेक्षक मांजरेकर जे.के. यांनी प्रास्ताविकातून परीक्षेसाठी केलेले विशेष नियोजन आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे या यशातील मोलाचे योगदान यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक मोरे एच.बी. यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले, तर आमले सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्याला मंचावर विद्यालयाचे प्राचार्य पाटील डी.आर., सुनित सावंत, श अजय करंबे, शिक्षण विस्तार अधिकारी श् अरविंद मोरे, ज्येष्ठ शिक्षक पाटील ई.सी., गर्जे एन.एम., मुंडे एच.जे., तडवी आय.बी., सौ. शिर्के एस.ए., ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. सौ. देवगावकर मॅडम, सौ. जमदाडे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment