म्हसळा : सुशील यादव
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाने मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आणि आवाहन जारी केले आहे. मतदान केंद्राच्या आत गोपनीयता भंग करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे.
अनेकदा उत्साहाच्या भरात मतदार मतदान करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र, रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, "मतदान ही एक गोपनीय प्रक्रिया आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही."
रायगड पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट शब्दात बजावण्यात आले आहे की
मतदान करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे.
असे फोटो/व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप इ.) किंवा अन्य कोणत्याही प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
निवडणूक काळात कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी रायगड पोलिसांनी खालील संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत:
पोलीस नियंत्रण कक्ष, रायगड: 02141-228473 / 112
मोबाईल क्रमांक: 7447711110
रायगड पोलिसांनी सर्व मतदारांना या नियमांचे पालन करण्याचे व निवडणूक प्रक्रियेची पवित्रता आणि गोपनीयता राखण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment