म्हसळा (प्रतिनिधी):
म्हसळा तालुक्यातील मौजे वरवठणे येथे घरातच बेकायदेशीररीत्या गोवंशाची कत्तल सुरू असताना म्हसळा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रविवारी (दि. ०८) सकाळी पावणेसातच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी ७० किलो गोवंश मांस, वाहने आणि कत्तलीसाठी वापरलेली हत्यारे असा एकूण १ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील एक आरोपी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवठणे येथील आरोपी नियाज महामुद तालीब याच्या राहत्या घरात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय दौलत पुरी आणि पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी आरोपी गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून मांस वाटप करण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले.
पोलिसांना पाहताच तिसऱ्या क्रमांकाच्या अज्ञात आरोपीने फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याला धक्का देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
एक काळ्या-पिवळ्या रंगाची पियाजीओ रिक्षा (MH 06 BW 2247) - किंमत ८०,०००/-
एक काळ्या रंगाची होंडा डीओ स्कूटी (MH 06 CM 1305) - किंमत ४०,०००/-
सुमारे ७० किलो गोवंश मांस (शिंगांसह मुंडके व इतर भाग) - किंमत १४,०००/-
लाकडी कुंडा आणि कत्तलीसाठी वापरलेले सुरे, कोयता व इतर साहित्य.
एकूण जप्त मुद्देमाल: १,३५,२००/- रुपये.
याप्रकरणी खालील आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे: नियाज महमुद तालीब (वय ४२, रा. वरवठणे) मेहफूज किफायती तालीब (वय २०, रा. वरवठणे) व तिसरा एक अज्ञात व्यक्ती (रा. आगरवाडा, म्हसळा - फरार) या घटनेचा अधिक तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री. एस. पी. रोहिणकर करत आहेत. सदर कारवाई प्रसंगी
पोशि 2105 चितारे ,पोशि 1429 पुरी ,पोशि 1360 मुल्ला, मापोशी 624 कानावडे
मापोशी 211 शिंदे ,चालक पोलीस हवालदार पोळ हजर होते.
Post a Comment