म्हसळा | सुशील यादव
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी (दि. २९/१२/२०२५) पंचायत समिती, म्हसळा येथे तालुक्यातील विकासकामे व जनतेच्या विविध प्रश्नांवर आढावा सभा घेतली. यावेळी तुरुंबाडी, काळसुरी व वारळ येथील पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याचा मुद्दा विशेषत्वाने उपस्थित करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
पाणीटंचाईने त्रस्त गावकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तटकरे यांनी नवीन ₹२ कोटींची पाणीपुरवठा योजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले. तसेच तात्पुरता पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देत, सभास्थळावरूनच संबंधित ठेकेदाराला फोन करून जाब विचारला.
“काम सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदाराची नोंदणी रद्द करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन,” असा सज्जड दम त्यांनी ठेकेदाराला भरला.
याच सभेत म्हसळा शहरातील बौद्ध समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मांडण्यात आला. त्यावर तहसीलदार व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश तटकरे यांनी दिले.
यासोबतच ग्रामीण भागातील रस्ते, मूलभूत सुविधा यांचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
आढावा सभेला उपस्थित:
तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी माधव जाधव, पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, कृषी सभापती बबन मनवे, नाझीम हसवारे, अनिल बसवत, संदीप चाचले, सोनल घोले, महेश घोले, किरण पालांडे, प्रसाद बोर्ले, संजय कर्णिक, नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांवर थेट कारवाईचा इशारा देत खासदार तटकरे यांनी प्रशासनाला कामाच्या गतीबाबत स्पष्ट संदेश दिला.
Post a Comment