म्हसळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवघ्या २४ तासांत शेळ्या-बोकड चोरीचा छडा; आरोपी जेरबंद
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंझरी येथे झालेल्या शेळ्यांच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून चोरीला गेलेला ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकाकडे सुपूर्द केला आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोंझरी येथील रहिवासी दिलीप मोतीराम विचारे (७०) यांचा गुरांचा गोठा असून, दि. २५ डिसेंबर २०२५ च्या सायंकाळी ६:४५ ते २६ डिसेंबरच्या पहाटे ५:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोठ्यात प्रवेश केला. चोरट्यांनी गोठ्यातील तीन शेळ्या आणि एक बोकड, ज्याची एकूण किंमत सुमारे ४४ हजार रुपये होती, लंपास केली होती. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि तपासातील कौशल्याच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुख्य आरोपी आफताब अन्वर खोपटकर (२७, रा. पांगळोली) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीला गेलेल्या सर्व तीन शेळ्या आणि बोकड पोलिसांनी जप्त करून फिर्यादी दिलीप विचारे यांच्या स्वाधीन केले आहेत. या गुन्ह्यातील दुसरा साथीदार रिजवान सर खोत (रा. पांगळोली) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई चितारे, पवार, मुल्ला आणि पुरी यांच्या पथकाने केली. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या जनावरांची चोरी झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी तत्परतेने आरोपीला अटक केल्याने म्हसळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment