माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल; उपचाराअभावी १४ वर्षीय मुलाचा झाला होता मृत्यू
म्हसळा: सुशील यादव
उपचारांमध्ये कमालीचा निष्काळजीपणा केल्यामुळे एका १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याप्रकारणी, माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा तालुक्यातील घुम येथील रहिवासी गवांग दिनेश गायकर (वय १४ वर्षे) याला एप्रिल २०२५ मध्ये 'केसतोड'चा फोड आल्याने आणि ताप आल्याने त्याच्या वडिलांनी प्रथम ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे उपचारासाठी नेले होते. तिथून त्याला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवण्यात आले.
दिनेश गायकर (वडिलांनी) दिलेल्या तक्रारीनुसार, माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलावर पूर्ण उपचार केले नाहीत, तसेच त्याला तातडीने भरती (Admit) करून घेण्यासही नकार दिला. मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला पुन्हा म्हसळा येथे आणले असता, ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर म्हसळा पोलीस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड येथील तज्ज्ञ समितीकडे हा तपास सोपवण्यात आला होता. या समितीने दिलेल्या अहवालात डॉ. अभिषेक रापते आणि डॉ. नितिश सावंत यांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले.
समितीच्या अहवालाच्या आधारे आणि मृत मुलाचे वडील दिनेश सखाराम गायकर यांच्या तक्रारीवरून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६(१) आणि ३(५) अन्वये डॉ. अभिषेक रापते व डॉ. नितिश सावंत यांच्यावर ३० डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र अच्युत पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एस.पी. रोहिणकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Post a Comment