रोहा (रायगड) – बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यालाही 'सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग' (CIIIT) या अत्याधुनिक प्रकल्पासाठी केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. सुमारे १०५ कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पासाठी 'टाटा टेक्नॉलॉजीज'कडून केंद्र मंजुरीचे पत्र महिला व बालविकास मंत्री मा. ना. कु. आदिती तटकरे यांच्याकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आले.
हे केंद्र रोहा एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणार असून, गेल्या चार महिन्यांत राज्यात मंजूर झालेल्या अशा प्रकारच्या चौथ्या केंद्राची नोंद रायगडच्या नावावर झाली आहे. विशेष म्हणजे, मागील दोन आठवड्यांत बीड, दीड महिन्यांत नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन केंद्रांची मंजुरी मिळाल्यानंतर रायगडच्या विकासातही महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
कौशल्य, रोजगार आणि उद्योगवाढीस नवे परिमाण
या उपक्रमामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युवकांना उद्योगसुलभ व रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ तयार होऊन रायगडमधील औद्योगिक विकासास मोठी चालना मिळणार आहे.
प्रकल्पासाठी ८९ कोटी रुपये टाटा टेक्नॉलॉजीजकडून, तर उर्वरित १६ कोटी रुपये राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून उभारले जाणार आहेत.
या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, "या केंद्रामुळे स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील आणि संपूर्ण औद्योगिक परिसराला मजबुती मिळेल."
रोहा आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी ही निश्चितच एक ऐतिहासिक आणि आनंदाची घडामोड आहे.
Post a Comment