दिवेआगरच्या गुणवत्तेचा सन्मान : श्रीवर्धन तालुक्यातील पहिली आयएसओ ग्रामपंचायत

टीम म्हसळा लाईव्ह

तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतीला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्रदान करण्यात आले आहे. एस. आर. सर्टिफिकेट संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी संस्थेचे लीड ऑडिटर किरण भगत यांच्या हस्ते राज्याच्या महिला, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. आयएसओ मानांकन मिळवणारी दिवेआगर ग्रामपंचायत श्रीवर्धन तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. जागतिक गुणवत्ता प्रणाली या चाचणीमध्ये दिवेआगर ग्रामपंचायतीने आपला सहभाग नोंदवून कंपनीच्या निकषानुसार तीन महिन्यांत ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची कामकाज पद्धत, स्वच्छता, नागरिकांना मिळणारी वागणूक शासकिय योजनांची माहिती व त्याची अंमलबजावणी, आरोग्यसेवा, पाणी, रस्ते, दिवाबत्ती, वृक्षारोपण, शिक्षण व इतर मुलभूत सुविधा पुरविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर हा सन्मान प्राप्त केला. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत गावाचे अभिनंदन करताना सांगितले की, मी राज्यभरातील मोठ्या ग्रामपंचायतींना भेट देत असते, तिथे तिथे दिवेआगर गावाचा उल्लेख आवर्जून करते. हे पर्यटनस्थळ असल्याने गावाची व समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता ठेवाल तेवढा पर्यटकांचा ओघ वाढेल. ही सर्वांची जबाबदारी आहे. दिवेआगरचे सुवर्ण गणेश मंदीर हे आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा भाग आहे. समुद्र किनाऱ्याबरोबरच सुवर्ण गणेश मंदिरालासुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. त्याच्याच कृपा आशीर्वादाने येथे सुख-समृद्धी नांदत आहे, असे त्या म्हणाल्या. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील खेकडा व कोलंबी प्रतीकृती, सेल्फी पॉईंटच्या घर्तीवर दिवेआगर येथे असलेल्या कासव संवर्धनाच्या अनुषंगाने कासवाची प्रतिकृती उभारण्याचा मानस असून जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे ती तयार असून त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध केल्यास ती लवकरात लवकर उभारण्यात येईल, असा शब्द दिला.

एस. आर. सर्टिफिकेट संस्थेचे संस्थपक अध्यक्ष आणि लीड ऑडिटर किरण भगत यांनी सांगितले की, ही जागतिक मानांकन संस्था असून त्याचे कार्यालय स्वित्झर्लंड येथे आहे. वस्तू व सेवा यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मानांकन दिले जाते. सहजासहजी हे मानांकन मिळत नाही. महाराष्ट्र शासनाने २०१९ साली एक शासन निर्णय काढला की, राज्यातील २८ हजार ५०० ग्रामपंचायती या आयएसओ म्हणजेच गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आल्या पाहिजे मी अपेक्षा करतो की तालुक्यातून टॉप टेन ग्रामपंचायती तरी आयएसओ मानांकन झाल्या पाहिजे.

याबाबत रायगड जिल्हा हा प्रथम क्रमांकवर आहे. रायगड जिल्ह्यातील ५०९ ग्रामपंचायतीं पैकी ११३ ग्रामपंचायतींनी आयएसओ सन्मान प्राप्त केला आहे. ग्रामस्थांकडे काही संकल्पना असतील तर त्याचा उपयोग गावासाठी करा, असे आवाहन करतानाच, कोकणामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल किरण भगत यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक शंकर मयेकर यांच्या संकल्पनेला सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे लाभलेले सहकार्य यामुळे हा सन्मान प्राप्त झाला असून आयएसओ ९००१:२०१५ हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवणारी दिवेआगर ही श्रीवर्धन तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा