म्हसळा एसटी स्टॅन्ड स्थलांतरामुळे प्रवाशांचे हाल; विद्यार्थ्यांसाठी तातडीने सोयीसुविधांची मागणी

टीम म्हसळा लाईव्ह 

म्हसळा शहरातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे श्रीवर्धन-म्हसळा रोड लगत असलेल्या म्हसळा एसटी स्टॅन्डचे स्थलांतर करण्यात आले आहे. परंतु, या निर्णयामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह खेडेगावांतून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उभे राहूनच बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना भिजतच शाळा आणि महाविद्यालयात जावे लागते, आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ व संबंधित ठेकेदारांनी बसस्थानकाच्या व्यवस्थेची सुधारणा करून विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.

या समस्येबाबत सोशल मीडियावर आवाज उठवण्यात आला असून, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगडचे उपाध्यक्ष निलेश मंदाडकर यांनी या गैरसोईकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी एसटी महामंडळ व संबंधित प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा