Shiv Rajyabhishek Painting : शिवराज्याभिषेक सोहळ्याचे समोरून काढलेले चित्र यापूर्वी कधी पाहिलंय का?
संतोष चौकर : श्रीवर्धन
शिवछत्रपतींचा राज्यभिषेक सोहळा हा महाराष्ट्रासह या देशासाठी ऐतिहासिक दिवस होता. किल्ले रायगडावर तर वर्षातून दोनदा म्हणजे तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे असे दोनवेळा शिवराज्याभिषकोत्सव साजरे केले जातात.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आपण नेहमी चित्र पाहतो. ते चित्र एकाबाजूने साकारलेले आहे. आता श्रीवर्धनमधील चित्रकार आणि रांगोळी कलाकार वीरेश दत्तात्रय वाणी यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे समोरून चित्र रेखाटले आहे. हे हटके आणि आकर्षक चित्र आता राजभवनची आणि महाराष्ट्राची शान वाढवत आहे.
चित्रकार वीरेश वाणी यांनी हे चित्र राज्यपाल रमेश बैस यांना गुरुवारी (27 जून) भेट दिले. हे सुंदर आणि नजर खिळवणारे चित्र पाहून राज्यपालांनी वाणी यांचे कौतुक केलेच शिवाय हे चित्र राजभवनमध्ये आवर्जून लावले आहे. त्यामुळे वाणी यांच्यावर सध्या अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. वीरेश वाणी हे मूळचे श्रीवर्धनचे असून लहानपणापासूनच त्यांना चित्र काढण्याची तसेच रांगोळ्या काढण्याची आवड आहे. यापूर्वी त्यांनी स्पर्धांमध्ये दिग्गज नेत्यांचे तसेच खेळाडूंची रांगोळी काढून अनेक बक्षिसे मिळवली आहेत. सध्या ते उल्हासनगरमध्ये वास्तव्यास असून सणासुदीला आवर्जून श्रीवर्धनला येतात.
तीन वर्षांची मेहनत
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र 4 फूट आणि 3 फूट या आकाराचे असून त्याचे कॅनव्हस प्रिंट चित्रकार वाणी यांनी राज्यपाल रमेश बैस यांना भेट दिली आहे. हे चित्र काढण्यासाठी वीरेश वाणी त्यांनी अनेक इतिहास अभ्यासकांची मदत घेतली. त्यामुळे हे चित्र पूर्ण करायला त्यांना तीन वर्षे लागली.
चित्र काढल्यानंतर राजभवनमध्ये देण्याची इच्छा झाली
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे समोरून चित्र काढायचे एवढेच ठरवले होते. त्यासाठी तीन वर्षे लागली. चित्र पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांपर्यंत पोहोचावे असे वाटल्याने राजभवनात देण्याची माझी इच्छा झाली. त्याप्रमाणे मी रितसर राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आणि हे चित्र 27 जून रोजी राज्यपालांना भेट म्हणून दिले.
- वीरेश दत्तात्रय वाणी, चित्रकार
Post a Comment