श्रीवर्धन मधील एसटी बसेस मध्ये संततधार कायम ; गळक्या स्लिपर बस मधून ओला चिंब प्रवास !


गळक्या एस टी. बसेस पावसात रस्त्यावरून धावतातच कशा?

टीम म्हसळा लाईव्ह
सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी आधीच खिळखिळी झाली आहे. त्यात आता महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. 
तात्पुरती डागडुजी करून बसगाड्या धावत असल्या तरी जास्त पावसात बसमध्ये छत्री किंवा रेनकोट घालून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
नव्या गाड्यांचा पुरवठा ठप्प झाला आहे. एसटीचे टायर गुळगुळीत आणि बस गळकी झाल्यामुळे श्रीवर्धन आगारातील एसटी बसच्या दुर्दशेचा प्रश्न समोर आला आहे.
सर्वसामान्य लोक पावसाळ्यापूर्वी आपल्या घरांची दुरुस्ती करतात. गळती होऊ नये किंवा पावसामुळे त्रास होऊ नये यासाठी ही दुरुस्ती किंवा देखभाल केली जाते. अशीच देखभाल एसटी महामंडळ एसटी बसेसच्या बाबतीतही करत नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहार. ज्या गाड्या आपण पावसाळ्यात रस्त्यावर सोडणार आहोत, त्या गळती होणाऱ्या असता कामा नये. प्रवाशांना त्रासहोता कामा नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असतानाही गळक्या एस टी. बसेस पावसात रस्त्यावरून धावतातच कशा? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. आज श्रीवर्धन ते नालासोपारा ला सोडण्यात आलेल्या बस मध्ये प्रवासादरम्यान पावसाचे पाणी धो धो गळत होते. त्यामुळे सीटवर बसलेल्या प्रवाशांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

तसेच सदर गाडी स्लीपर असल्याने अप्पर सीट वर चढण्यासाठी असलेला जिना ही तुटलेला होता त्यामुळे प्रवाश्यांना आपला जीव मुठीत धरून वर चढावे लागत होते.

याबाबत बसमधून श्रीवर्धन ते नालासोपारा दरम्यान प्रवास करणाऱ्या संतप्त आणि गळतीमुळे त्रस्त आलेल्या प्रवाशांनी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. बसमधील गळतीचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पाठवले. श्रीवर्धन मधील या बसमध्ये बसल्यापासून पावसाच्या पाण्यामुळे बसमध्ये होणाऱ्या गळतीमुळे झालेला त्रास आणि मनस्ताप कथन केला. 


तसेच बस मध्ये असलेले पंखे लाईट ही चालू नसल्याने त्याचा त्रास ही प्रवाश्यांनी सहन करत प्रवास केला.  या मार्गावर धावणाऱ्या आणखी बसेस बाबतही असल्याच तक्रारी आहेत. त्यामुळे अशा गळक्या गाड्या दुरुस्त होणार नसतील तर भंगारात काढाव्यात आणि गाड्या खराब असतांनाही त्या ओके म्हणून रस्त्यावर धावण्यासाठी मंजुरी देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चोकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा