महर्षी कर्वे वुमन मॉडेल कॉलेजचा अजब फतवा : पाचशे रुपयांच्या दंडाची विद्यार्थ्यांना नोटीस

संग्रहित छायाचित्र 

श्रीवर्धन : प्रतिनिधी 

एसएनडीटी विद्यापीठाच्या श्रीवर्धन येथील महर्षी कर्वे वुमन मॉडेल कॉलेजच्या प्राचार्यांनी अजब फतवा काढला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग व एसएनडीटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‌‘उडान’ ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा (दि.4) मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला धावण्यासाठी पाच किलोमीटरचे अंतर निर्धारित करण्यात आलेले आहे. परंतु, ज्या विद्यार्थिनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत किंवा हजर राहू शकणार नाहीत, त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल, अशी लेखी नोटीसच महाविद्यालयाने काढली आहे.

महर्षी कर्वे वुमन मॉडेल कॉलेज या ठिकाणी श्रीवर्धन तालुक्यातून विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. म्हसळा तालुक्यातूनदेखील काही विद्यार्थिनी या ठिकाणी येतात. परंतु, या मॅरेथॉन स्पर्धेची वेळ सकाळी सात वाजता ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थिनींची गैरसोय होणार आहे. कॉलेजने काढलेल्या नोटिसीमध्ये ज्या विद्यार्थिनींना सकाळी लवकर येणे शक्य नसेल त्यांची निवासाची व्यवस्था आदल्या दिवशी रात्री श्रीवर्धन येथे करण्यात येईल, असे लिहिले आहे. परंतु, सकाळी लवकर स्पर्धा आयोजित करण्याचे कारण काय, असा प्रश्नदेखील विद्यार्थिनींच्या पालकांना पडलेला आहे.

एखादी विद्यार्थिनी आजारी असेल किंवा ती पाच किलोमीटर धावण्याच्या क्षमतेची शरीरयष्टी नसेल, तर अशा विद्यार्थिनींनी विनाकारण कॉलेजला पाचशे रुपये दंड भरायचा का? असा प्रश्नदेखील पालकांमधून उपस्थित केला जात आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी ॲम्बुलन्सची व्यवस्था केली आहे का? याबाबतदेखील महाविद्यालयाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. तरी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी याबाबत योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी पालकांमधून करण्यात येत आहे.


महर्षी कर्वे वुमन मॉडेल कॉलेजने काढलेले पत्र हे विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे यासाठीच काढलेले आहे. त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही. - डॉ. डी.पी. राणे, प्राचार्य

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा