श्रीवर्धन । कोकण सागरी महामार्गातील बागमांडले बाणकोट खाडीवरील पूल गेले अनेक वर्ष गंट्यागळ्या खात आहे. 15 वर्षांपूर्वी या पुलाच्या कामाला शरद पवार यांच्याहस्ते सुरुवात करण्यात आली मात्र आजपर्यंत या पुलाचे काम अर्धवट पडून आले. कोकणातील सर्वच नेते, खासदार हा पुल पुर्ण करण्यास अपयशी ठरले आहेत. जणूकाही या पुलाचे अर्धवट काम म्हणजे या नेत्यांच्या अपयशाचे हे स्मारकच बनून राहीले आहे.
बागमांडले ते बाणकोट दरम्यान पिलरचे काम पूर्ण झालेले असून त्यावर गर्डल टाकण्याचे काम बाकी आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यास रायगड व रत्नागिरी जिल्हा जोडला जाणार आहे. पुण्यावरून श्रीवर्धनकडे येणार्या पर्यटकांना केवळ 160 किलोमीटर अंतर कापावे लागते. सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यास गणपतीपुळे येथे जाण्यासाठी सगळ्यात कमी अंतराचा मार्ग म्हणून या मार्गाकडे पाहिले जाईल. सध्या या ठिकाणी फेरीबोटची सुविधा उपलब्ध आहे. परंतु फेरीबोटची सुविधा उपलब्ध असली तरीही अनेक वेळा पर्यटकांना समोरच्या धक्क्यावर उभी असलेली फेरीबोट येईपर्यंत तासंतास वाट बघावी लागते. त्यामुळे प्रवासाचे अंतर कमी होत असले तरी प्रवासाचा वेळ मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.
सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यास श्रीवर्धन ते रत्नागिरी किंवा दापोली या परिसरात एसटी बस सेवा देखील सुरू होऊ शकते. जेणेकरून प्रवाशांना आपला प्रवास सुखकर करता येईल. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे समुद्रकिनारे व मंदिरे पाहण्यासाठी असंख्य पर्यटक या ठिकाणी येत असतात. याच पर्यटकांना दापोली तालुक्यातील समुद्रकिनारे, गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारे पाहून गणपतीपुळे सुध्दा या मार्गामुळे पाहण्यासाठी सोपे जाणार आहे. मात्र आजपर्यंत राज्यात आलेल्या कोणत्याही सरकारने या पुलाच्या पूर्णत्वाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
त्यामुळे सदर पुलाचे काम रखडलेले आहे. नुकतीच रेवस ते रेड्डी सागरी मार्गासाठी भूसंपादनाच्या सर्वे नंबर ची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. जर का या महामार्गाबाबत सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहे. तरी या पुलाचे काम का पूर्ण होत नाही? असा प्रश्न या ठिकाणचा स्थानिक नागरिक विचारत आहे. सदर पुलाच्या बांधकामाची अवस्था मुंबई गोवा महामार्गाच्या कामासारखीच झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
2018 पासून पुलाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील लोकांना जाण्या-येण्यासाठी फेरीबोटचा आधार घ्यावा लागत आहे. सागरी सेतू प्रकल्पांतर्गत होणारा हा पूल पर्यटनाच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरणारा आहे. प्रत्यक्षात सात वर्षे झाली या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम केव्हा पूर्णत्वाकडे जाणार? याबाबत कोणीही कोणत्याही प्रकारची खात्री देऊ शकत नाही. कारण सरकार कोणाचेही आले तरी या पुलाच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
परंतु सातत्याने पुलाचा वाढत जाणारा खर्च व बजेटमध्ये असणारी तरतूद यातील फरकामुळे सदर ठेकेदाराने हे काम सोडून दिले आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार या पुलाचे काम पूर्ण होईल सरकार सांगत असते मात्र या पुलाच्या बांधकामाकडे रायगड, रत्नागिरीतील नेते लक्ष देतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Post a Comment