श्रीवर्धन आगारातील चालकाचा प्रताप. मद्यपान करून चालविली माणगाव ते वडखळ स्लीपरकोच गाडी.बेचाळीस प्रवाशांचा जीव टांगणीला.
श्रीवर्धन : समीर रिसबूड
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.गाड्यांचा प्रवास म्हणजे सुखकर प्रवास ह्या प्रवासीवर्गाच्या विश्वासाला श्रीवर्धन आगाराच्या चालकामुळे तडा गेला आहे. मद्यपान करून मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव ते वडखळ दरम्यान अठ्ठावन्न किलोमीटरच्या अंतरावर निष्काळजीपणा दाखवत बेजबाबदारपणे आपल्या ताब्यातील गाडी चालवत प्रवासीवर्गाचा जीव टांगणीला लागल्याची घटना नुकतीच घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन आगाराची दुपारी चार वाजता नियमित वेळापत्रकानुसार मुंबई येथे मार्गस्थ होणारी श्रीवर्धन माणगाव मुंबई ही स्लीपरकोच गाडी(एम.एच.०९ एफ.एल.०९७२) साधारण साडेचारच्या सुमारास बसस्थानकातून मुंबईच्या दिशेने निघाली.गाडी माणगाव बसस्थानकात गेली असता चालक अबाजी दडस हा गाडी फलाटावर उभी करुन रस्त्याच्या दिशेने चालत निघून गेला.वीस मिनिटांनी चालकांने गाडीचा ताबा घेत मुंबईच्या दिशेने वळवली.गाडीने नागोठणे स्थानक सोडले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटत असल्याचे वाहक/चालक अभय कासार यांच्या निदर्शनास आले.गाडी नागोठणे ते वडखळच्या मधे आल्यावर वाहकाने चालकास थांबवायला सांगितली आणि वाहकाने भ्रमणध्वनी वरून घडलेली घटना श्रीवर्धन आगारप्रमुख महिबूब मणेर यांना सांगितली.
आगारप्रमुखांच्या सुचनेनुसार वाहकाने चालकाला बाजूच्या आसनावर बसवीत वडखळ ते रामवाडी हे चार किलोमीटर अंतरावर गाडी चालवत रामवाडी बसस्थानकापर्यंत गाडी आणली.रामवाडी बसस्थानक गाडी आल्यावर चालकावर रितसर गुन्हा नोंदवण्यात आला असून चालकावर एफ.आर.आय.दाखल करण्यात आला असुन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चालक मद्यपान करून गाडी चालवतो हा मोठा गुन्हा आहे.नागोठणे ते वडखळच्या मधे गाडी गेल्यावर वाहकाचा घडलेल्या प्रसंगाबाबतीत फोन आला.वाहक तसेच चालक असलेल्या अभय कासार यांना आम्ही दिलेल्या सुचनेनुसार त्यांनी गाडी रामवाडी पर्यंत नेली.चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तत्काळ निलंबित केलं आहे.--महिबूब मणेर.श्रीवर्धन आगारप्रमुख.
गाड्या लांब पल्ल्याच्या असो वा स्थानिक पल्ल्याच्या.गाड्या मार्गस्थ होण्याअगोदर चालक,वाहकांची रितसर तपासणी करावी. श्रीवर्धन माणगाव मुंबई गाडीवरील चालकाच्या वृत्तीमुळे बेचाळीस प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.चालकाचे प्रताप वेळेत लक्षात आले नसते तर सणासुदीच्या दिवसात भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती अशी प्रतिक्रिया प्रवासीवर्गाकडून येत होत्या.
Post a Comment