बोर्लीपंचतनमध्ये पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप ; भर पावसात उत्साह


◆ श्री गणेशपेठ मंडळाचा एकत्रित मिरवणुकीने एकात्मतेचा संदेश

◆ परिसरातील ३६४० गौरी-गणपती विसर्जनसाठी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त

गणेश प्रभाळे

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे मोठय़ा उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात शनिवारी पाचव्या दिवशी वाजतगाजत गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा श्री गणेशपेठ मंडळातील एकत्रित निघालेल्या विसर्जन मिरवणूकीमुळे शहराचा वेगळा दिमाख दिसत होता.


बोर्लीपंचतन परीसरात परंपरेनुसार गावागावात प्रत्येक खोतीच्या नावाने ओळख आहे. येथे पूर्वापार सुरू झालेल्या मिरवणुकीची जय्यत तयारी यावर्षी करण्यात आली. विशेषतः गणेशपेठ खोतीतील शंभरहून अधिक कुटुंबांनी एकत्रित येऊन गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे या मिरवणुकीतून एकात्मतेचा संदेश मिळाला आहे.

पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बोर्लीपंचतन छत्रपती शिवाजी चौकापासून ते दिवेआगर समुद्रकिनारी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. विसर्जनच्या पाचव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, पाऊस – पाण्याची तमा न बाळगता गणेशभक्तांकडून विसर्जन जल्लोषात साजरे करण्यात आले. यावेळी एक मिरवणूक एक गणवेश असा पेहराव, सोबत ढोल ताशांचा गजर, आणि या तालावर हातात लेझिम घेऊन अबाल वृद्धांची थिरकणारी पाऊले या मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा करत होती. यंदा दीड दिवस नंतर पाच दिवस व पुढे दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन देखील एकत्रित निघणार असून ही परंपरा अविरत सुरू राहील अशी माहिती खोती प्रमुख लीलाधर खोत यांनी दिली.

गणेशभक्त आपल्या कुटुंबियांसमवेत मोठ्या भक्तिभावाने समुद्रकिनारी येऊन आरती करत गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते. विसर्जन सुरू असतानाच ‘पुढल्या वर्षी लवकर या…’चा घोष आसमंतात घुमत होता. गणरायाच्या अखेरच्या निरोपाचा क्षण हेलावून टाकणारा होता. कारण विसर्जनानंतर घराकडं परतणाऱ्या गणेशभक्तांची जडावलेली पावलं याची साक्ष देत होती.

पाच दिवसांच्या गणपती विसर्जन वेळी समुद्रकिनारी वाऱ्यासह पावसाचा जोर सुरूच होता. या प्रसंगात विसर्जन सोहळा र्निविघ्न पार पाडण्यासाठी दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा