श्रीवर्धन - संतोष चौकर
ब्रिटिश काळापासून असलेली श्रीवर्धन तहसील कार्यालयाची इमारत अत्यंत मोडकळीस आलेली आहे. इमारतीच्या छपराचे अनेक भाग कोसळून पडले आहेत. तर इमारत केव्हाही पडेल अशा स्थितीमध्ये उभी आहे. ब्रिटिश काळामध्ये श्रीवर्धन संस्थानात नवाब सरकार होते. या नवाब सरकारच्या वेळी "मामलेदार कचेरी" या नावाने तहसीलदार ऑफिसला ओळखले जात असे. तालुक्यातील वाढती लोकसंख्या व वाढते शहरीकरण यामुळे ही इमारत अत्यंत कमी जागेत सुरू होती. परंतु काही दिवसांपूर्वी सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी या उद्देशाने श्रीवर्धन येथे नगरपरिषद कार्यालयाच्या आतील बाजूला प्रशासकीय भवन ही सर्व कार्यालय एकाच ठिकाणी असणारी इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस, तलाठी ऑफिस, सर्कल ऑफिस, सब रजिस्टर ऑफिस, कृषी विभाग ऑफिस इत्यादी विभाग कार्यरत आहेत. याच तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या बाजूला उप कोषागार कार्यालय आहे व त्याच्या समोरच्या बाजूला श्रीवर्धन पंचायत समिती आहे. पंचायत समितीच्या इमारतीची पंधरा वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आल्यामुळे ती सुस्थितीत आहे परंतु जुनी तहसील कार्यालयाची इमारत केव्हाही कोसळेल या परिस्थितीमध्ये आहे. या इमारतीचा जिन्याचा भाग कोसळून गेला आहे. तर जोराचा पाऊस किंवा वारा आल्यानंतर ही इमारत कोसळणार हे नक्की आहे. प्रशासनाकडून ही इमारत पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. या ठिकाणी इमारत पडल्यानंतर एखादा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तरी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने सदरची इमारत पाडून घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
Post a Comment