श्रीवर्धन प्रतिनिधी :
दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्रासाठी पाच कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक शेतकरी व बागायतदारांना उत्पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहे. दिवेआगरच्या पर्यटन व्यवसायालाही यामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व लगतच्या परिसरात सुपारी हे एक प्रमुख व व्यापारी तत्त्वावर घेण्यात येणार नगदी पीक आहे. सुपारीची आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात आहे. या पिकासोबत नारळ, केळी, पपनस, जाम तसेच जायफळसारखी मसाला पिके घेतली जातात. जून २०२० मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धनमधील नारळ व सुपारी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र दिवेआगरमध्ये सुपारी संशोधन प्रकल्प झाल्यास, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व बागायतदारांना कृषी तंत्रज्ञान मिळवण्यासाठी तसेच कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. या प्रकल्पासाठी कनिष्ठ प्राध्यापक, संशोधन सहायक, कृषी सहायक, लिपिक, माळी, मजूर, शिपाई, प्रयोगशाळा सेवक अशा एकूण दहा पदांची भरती होणार आहे.
पाच एकर जागेत प्रकल्प- सुपारी संशोधन केंद्रासाठी दिवेआगर ग्रामपंचायतीकडून पाच एकर जमीन नव्याने वर्ग करण्यात आली आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र विकसित होणार आहे. अपुऱ्या जागेमुळे अडचण श्रीवर्धन येथील एक एकर जागा ही सुपारी पिकावर आधारित आंतरपीक पद्धती, अन्नद्रव्य व्यवस्थापन व फळगळती नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण आदी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होती, मात्र ती अपुरी पडत असल्याने मोठ्या जागेत संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी बागायतदार करीत होते.
संशोधन केंद्राची प्रमुख उद्दिष्टे
● सुपारीवर संशोधन करून बुटक्या व दर्जेदार उत्पन्न देण्याच्या जाती विकसित करणे
● दिवेआगर येथील हवामान विचारात घेऊन नवीन आंतरपीक पद्धत विकसित करणे.
● शेतकऱ्यांसाठी विस्तार कार्यक्रम राबवणे.
● दिवेआगर पंचक्रोशीतील गावांचा एकात्मिक ग्रामविकास आराखडा करून प्रात्यक्षिक घेणे.
● दर्जेदार कलमे व रोपवाटिका विकसित करणे.
श्रीवर्धनची रोठा सुपारी प्रसिद्ध
भारतात केरळ आणि कोकणात सुपारीचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात २०१७ मध्ये सुपारी पिकाचे २१०० हेक्टर क्षेत्र होते. ते यंदा ४०० हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे रोठा सुपारी लागवडीकडे बागायतदारांचे अधिक कल आहे. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र उत्कृष्ट दर्जाची रोपे तयार करत असल्याने हे पीक लोकप्रिय ठरले आहे. श्रीवर्धनची रोठा सुपारी प्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. त्याचबरोबर साखरेचे प्रमाण २ ते ३ टक्के असल्याचे बागायतदार सांगतात.
सध्या साडेपाच कोटींचा प्रस्ताव विद्यापीठामार्फत महाराष्ट्र शिक्षण व कृषी परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. दिवेआगर येथील जागेची मोजणी व सपाटीकरण केले आहे, निधी प्राप्त झाला तर पाणी व जागेला कुंपण घालणे तसेच इतर विविध कामे करता येतील. - गणेश माळशे, विभागीय अधिकारी,
दिवेआगर सुपारी संशोधन प्रकल्पदिवेआगर येथील सुपारी ही बोर्ली-गोठा सुपारी म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सुपारी बागायतींचे मोठे नुकसान झाले. संशोधन केंद्रात सुपारीच्या विविध जाती विकसित होऊन सुपारी उत्पादन वाढण्यास मदत होईल शिवाय पर्यटनालाही चालना मिळेल.- सिद्धेश कोसबे, सरपंच
Post a Comment