मानव एकता दिवसा निमित्त पेण येथे मेगा रक्तदान शिबीर ; संत निरंकारी मिशनने केले आयोजन



मानव एकता दिवसा निमित्त पेण येथे मेगा रक्तदान शिबीर
संत निरंकारी मिशनने केले आयोजन
निरंकारी भक्तांकडून केले जाणार उत्साहपूर्ण रक्तदान

पेण : प्रतिनिधी

युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी मिशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मानव एकता दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने झोन रायगड 40-A अंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन पेण येथे रविवार, दि. 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी 09:30 ते दुपारी 02:30 वाजेपर्यंत मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन अध्यक्षतेखाली यादिवशी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा (हरियाणा) येथे एक विशाल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असून या शिबिरात मिशनचे भाविक भक्तगण मोठ्या उत्साहाने भाग घेतील. पेण येथे आयोजित रक्तदान शिबीर प्रसंगी रक्त संकलित करण्यासाठी शासकीय रक्तपेढी अलिबाग-रायगड यांची टीम उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, या दिवशी संपूर्ण भारतात 265 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुमारे 40 हजार ते 50 हजार युनिट रक्त संकलित होईल अशी अपेक्षा आहे. या शिबिरांचे आयोजन संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणार आहे. 

पेण येथे आयोजित रक्तदान शिबिर झोन रायगड 40-A झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून त्यांनी ही उपयुक्त माहिती दिली. तर रक्तदान शिबिराच्या दरम्यान प्रशासनाकडून देण्यात आलेले कोविड -19 चे निर्देश लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

समालखा येथे आयोजित होणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील व त्याचवेळी झूम ॲपच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील उर्वरित ठिकाणी आयोजित होणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही सामूहिक रूपात आशीर्वाद प्रदान करतील.

या व्यतिरिक्त त्याच दिवशी थेलेसिमिया विषयक चिकित्सा सुविधादेखील समालखा तसेच अन्य काही ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 18 ते 30 या वयोगटातील सर्व व्यक्ती लाभान्वित होऊ शकतील.

युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी नेहमीच समाज कल्याण कार्यांच्या प्रति निरंतर प्रयासरत राहिले. त्यांनी एका बाजूला सत्याचा बोध करून मानवमात्राला सर्व प्रकारच्या भ्रमातून मुक्त केले तर दुसऱ्या बाजूला नशाबंदी व साधे विवाह यासारख्या सामाजिक सुधारणांचा पाया घातला. त्यांनी मिशनचा संदेश केवळ भारतातच नव्हे तर विदेशांमध्येही पसरविला. परिणामी आज विश्वभरात 60 पेक्षा अधिक देशांमध्ये मिशनच्या शेकडो शाखा स्थापन झालेल्या आहेत. ज्यांच्या माध्यमातून सत्य, प्रेम व मानवतेचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविला जात आहे. बाबा गुरुबचन सिंह जी यांनी युवावर्गाच्या ऊर्जेला नवा आयाम देण्यासाठी त्यांना सदैव खेळांसाठी प्रेरित केले जेणेकरून त्यांची ऊर्जा उपयुक्त दिशेला लागेल आणि देश व समाजाची सुंदर निर्मिती होऊ शकेल.

मिशनच्या भक्तांसाठी निष्काम सेवा भावनेने केले जाणारे रक्तदान हे आधीपासूनच जनकल्याणाचे एक अभिन्न अंग बनुन राहिले आहे. युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांचे कथन 'रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको' हा संदेश मिशनच्या अनुयायांनी निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. या विशाल रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची उचित व्यवस्था केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा