टीम म्हसळा लाईव्ह
तीन तलाकची बातमी (Triple Talaq News) लावल्याचा राग मनात धरून पत्रकाराला मारहाण केल्याची घटना म्हसळा शहरात काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. साजिद इनामदार असे आरोपीचे नाव आहे. नेरळ मध्ये काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलीस (Railway Police) असलेल्या एकाने पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे जिल्ह्यात पत्रकार हे जनतेचे प्रश्न मांडताना जीवावर बेतणार नाही ना या द्विधा मनस्थितीत आहेत.
निकेश कोकचा हे एका वृत्तपत्रात म्हसळा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. 2019 साली साजिद इनामदार याच्या तीन तलाक संदर्भात त्यांच्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे आपली बदनामी झाली असून बातमी लावल्याचा राग साजिद याने मनात ठेवला होता. काल 10 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निकेश हा आपल्या कामासाठी बाजारपेठेत गेला होता.
काम आटोपून निघाला असता साजिद याने त्याला अडवून बातमी दिल्याने माझी बदनामी झाली असे बोलून कुठल्यातरी हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत निकेश जखमी होऊन त्याच्या उजव्या डोळ्याला जखम झाली आहे. निकेश याला मारहाण होत असताना बाजूच्या दुकानदारांनी मध्ये येऊन वाचवले. याबाबत निकेश याने दिघी सागरी पोलीस ठाण्यात साजिद विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून साजिद याला अटक करण्यात आली आहे.
Post a Comment