खाजगीकरण, राजकीय हस्तक्षेप यासह अनेक मागण्या
टीम म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या तिन्ही कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 28 आणि 29 असे दोन दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे या दोन दिवसात विज पुरवठा बंद झाला तर ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
या संपात अधिकारी, अभियंता याच्या 27 आणि 12 कंत्राटी संघटना या संपात सहभागी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 70 टक्के अधिकारी, कर्मचारी, अभियंता हे आजच्या लाक्षणिक संपात सहभागी झाले आहेत. अलिबाग चेंढरे येथील महावितरण कार्यालयासमोर अभियंता, कर्मचारी यांनी निदर्शने करून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महावितरणच्या तिन्ही कंपन्यांचे खाजगीकरण रद्द करा, केंद्र सरकारच्या विद्युत बिलाला विरोध, जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्यास विरोध, रिक्त पदाची होणारी दिरंगाई थांबवा, तिन्ही कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, अभियंते बदली धोरणावर एकतर्फी निर्णय, कंपनीतील वरिष्ठ पदावरील भरती, बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप बंद करा, कंत्राटी आणि आऊट सोर्सिंग कर्मचार्यांना 60 वर्षापर्यत नोकरीचे संरक्षण देणे या मागण्या संपकरी संघटनेच्या आहेत.
दरम्यान, अभियंता, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी या संपात सहभागी असले तरी तांत्रिक कर्मचारी आणि मागासवर्गीय संघटना कर्मचारी यांनी या संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे. सध्या अलिबागसह जिल्ह्यात विज पुरवठा सुरळीत सुरू असला तरी मोठा प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना दोन दिवस अंधारात काढावे लागतील.
Post a Comment