मुरूड जंजिरा : वार्ताहर
मुरूड तालुक्यातील काशीद बिचवर रविवारी दुपारी साडे बारा ते एक च्या सुमारास तीन तरुण पर्यटकांना मुरूड पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांनी वेळीच दाखविलेल्या दक्ष समयसूचकतेमुळे बुडताना वाचविण्यात आले आहे. रविवारी काशीद बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास कात्रज,पुणे पाच पर्यटक खाजगी वाहनाने काशीद बीचवर आले होते. पैकी श्रीकांत नीना ढाके वय 27, गणेश पाटील वय 23, नयन मुरलीधर सोनवणे वय 28 हे तिघे समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्यात पोहत असताना खोल पाण्यात पोहचल्याने तिघेही बुडू लागले. एवढ्या गर्दीत देखील येथे ड्युटीवर असलेले मुरूड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रशांत लोहार, यांनी प्रसंगाचे गंभीरता ओळखून 50 मीटर धावत शिट्टी वाजवत येऊन किनार्यावरील बोट चालक, आणि जीवरक्षक यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बोट चालक रोहन खोपकर, संजय वाघमारे, जीवरक्षक राकेश रक्ते आदींनी समुद्रात झेप घेऊन त्वरीत बुडणार्या किनार्यावर आणले. श्रीकांत ढाके, गणेश पाटील हे दोघे जवळजवळ पाण्यात बुडल्यातच जमा होते. मात्र राकेश रक्ते, संजय वाघमारे, आदींनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले, आणि किनार्यावर आणले. त्यांच्या नाकातोंडात गेलेले पाणी बाहेर आल्यानंतर त्यांना हायसे वाटले.मुरूडचे पोलीस निरीक्षक गवारे तातडीने घटनास्थळी पोहचले त्यांनी तिघांनाही धीर देऊन बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. तिघेही खूपच घाबरले होते. त्यांनी जीवाची आशा सोडली होती.काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असे म्हणता येईल, तरीही पोलीस शिपाई लोहार, यांची समयसूचकता या प्रसंगात सायरन प्रमाणे महत्त्वाची ठरली असे दिसून आले. याच वेळी याच बीचवर थोडया अंतरावर एका छोट्या मुलाला देखील रविवारी दुपारी पोलीस शिपाई लोहार यांचे समयसुचकते मुळे जीवदान मिळाल्याचे माहिती पोलिसांनी दिली मात्र त्याचे नाव काही कारणास्तव कळू शकले नाही.
Post a Comment