कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे गुरुवारी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारी आणि त्यानंतर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पारंपारिक कोळी गाण्यांचा बादशाह अशी त्यांची खास ओळख होती. कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. डोल डोलतंय वार्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी यासारखी अनेक कोळीगीतांचे ते गीतकार होते. मी हाय कोळी, सन आयलाय गो यासारखी अनेक कोळी गाण्यांचे ते गीतकार होते. त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले.
काशिराम चिंचय यांची गाजलेली गाणी
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काशिराम चिंचय यांनी कोळी-आगरी समाजातील पारंपरिक गीतांचा ठेका सातासमुद्रापार नेला. कोळी संगीताच्या ठेक्यावर महिला-पुरुष, आबालवृद्ध सर्वांनाच ताल धरायला भाग पाडले. अमराठी प्रेक्षकांच्या ओठातही या गाण्यांचे शब्द रुजले. पारु गो पारु वेसावची पारु, वेसावची पारु नेसली गो, मी हाय कोली, डोल डोलतंय वाऱ्यावर, डोंगराचे आरुन एक बाई चांद उगवला, हीच काय ती गोरी गोरी पोरी, सन आयलाय गो यासारख्या एकाहून एक सरस कोळीगीतांचे महाराष्ट्रातील असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमात अजूनही सादरीकरण होते.
Post a Comment