पेण तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लावणार - खा. सुनील तटकरे




जल जीवन मिशन अंतर्गत 38 गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत होणार  वितरण व्यवस्था



 " पेण तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लागणार असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत शाहपाडा धरणातून 38 गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये काश्मिरे, रोडे, उंबर्डे, धोंडपाडा, कोप्रोली, मळेघर, वडगाव, ओढांगी, बोर्झे, कणे, वाशी, वढाव,  मोठे वढाव,  नारवेल, बेनवले, काळेश्री, कान्होबा, मोठेभाल,  कांदळे, कांदळेपाडा, दिव, विठ्ठलवाडी, लाखोला, बहिरम कोटक, वाशी नाका, सरेभाग, वडखळ, शिर्की, वावे, कोळवे,  बेणेघाट, बोरी,  शिंगणवट,  मसद (खुर्द),मसद (बुद्रुक), बोरवे, शिर्की चाल नंबर1, उचडे या 38 गावांचा समावेश आहे. या या योजनेचा उदभव हेटवणे धरण व शाहपाडा धरण असून या योजनेसाठी 23 कोटी 11 लाख 45 हजार 626 एवढा निधी  प्रस्तावित आहे.
या प्रस्तावित योजनेत वडखळ, मसद, कोप्रोली, कणे,कांदळे, काळेश्री, दिव, बोर्झे, व बोरी या ठिकाणी उंच सलोह वाढीव पाणी टाक्याचा समावेश आहे.  या योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्याकडून डिसेंबर 2019 मध्ये तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली आहे.योजनेचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच खारेपाटातील पाणी प्रश्न सुटणार." अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी शहापाडा धरणावर झालेल्या आढावा बैठकीत दिली. 

पेण तालुक्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पालकमंत्री आदिती ताई तटकरे आमदार अनिकेत भाई तटकरे सतत पाठपुरावा करीत असून काही महिन्यांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पुरवठा व संबंधितांची  पेण तालुक्यातील पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी वरील योजना अंमलात आणण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून जल जीवन मिशन अंतर्गत 38 गावांना वितरण व्यवस्था प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत करण्यासाठी 23 कोटी 11 लाख 45 हजार 626 एवढा निधी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी,ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी,यांच्यासह उदय जवके,दयानंद भगत, ऍड. विकास म्हात्रे, नरेंद्र ठाकूर, विकास पाटील, जगन शेठ म्हात्रे, मळेघर सरपंच, वाशी सरपंच, परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा