रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यामुळे मी आमदार झालो, असे अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी नागोठणे येथील एका कार्यक्रमात खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत सांगितले.
दरम्यान, दळवी यांना आमदार करण्यात माझा कोणताही वाटा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले नाही; म्हणून ते शिवसेनेत गेले आणि शिवसेनेतून आमदार झाले, असे दळवी यांना सांगायचे आहे, अशी पडद्यामागची गोष्ट खासदार सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितली.
पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नागोठणे पत्रकार संघातर्फे आयोजन करण्यात आले हेाते. त्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यातील जुगलबंदी नागोठणेकरांना अनुभवला मिळाली. खासदार तटकरे, आमदार दळवी, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह राजकीय नेते, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी खासदार सुनील तटकरे यांच्या भोवती फिरत असते. त्यामुळे प्रत्येक राजकीय केंद्रबिंदू हा तटकरे यांच्या भोवती फिरत असतो. अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांनी याच कार्यक्रमातील आपल्या भाषणात खासदार सुनील तटकरे यांच्यामुळे मी आमदार झालो, असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आमदार दळवी यांच्या या वक्तव्याला सुनील तटकरे यांनी 'दळवी यांना आमदार करण्यात माझा कोणताही हात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले नाही, त्यानंतर दळवी हे शिवसेनेत गेले आणि विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत आमदार झाले. मात्र त्यांना हे माझ्या तोंडातून वदवून घ्यायचे असल्याने त्यांनी याबाबतचे भाष्य केले असावे, असे तटकरे यांनी सांगितले. आमदार दळवी यांना बत्ती कशी लावायची आणि विझवायची, हे बरोबर माहीत आहे. अशी मिश्किल जुगलबंदी कार्यक्रमात उपस्थितांना पाहायला मिळाली.
Post a Comment