टीम म्हसळा लाईव्ह
जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे व रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये होऊ शकणार्या कोविड-१९ विषाणूचा संभाव्य संक्रमणाचा धोका विचारात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्हा क्षेत्रातील पनवेल महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, सर्व नगरपंचायती व ग्रामीण क्षेत्रातील इयत्ता १ ते ९ आणि इयत्ता ११ वी चे सर्व वर्ग बंद करणे, सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांबाबत बंदचे आदेश जारी केले आहेत.
इ. १ ली ते ९ वी आणि इ. ११ वी चे वर्गामधील प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन दि.०५ जानेवारी २०२२ पासून दि.३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद राहील, इ.१ ली ते ९ वी आणि इ. ११ वी चे वर्गामध्ये ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापन शासन स्तरावरून वेळोवळी देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सुरु राहील, इ. १० वी व १२ वी ची बोर्डाची परीक्षा जाहीर झाली असून विद्यार्थ्यांचे माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने इ. १० वी व १२ वी चे वर्गामध्ये कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करुन प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन पूर्ववत सुरु राहील, वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण आवश्यक राहील, यापूर्वी लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागूच राहतील.
३० डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये दि.३१ डिसेंबर २०२१ पासून राज्यात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले. सद्य:स्थितीत राज्यात व रायगड जिल्ह्यामध्ये कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे. त्यानुसार वेळोवेळी शासन स्तरावरुन तसेच या कार्यालयाच्या स्तरावरून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
या आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती/आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार कारवाईस तसेच भारतीय दंड संहिता १८८, २६९, २७०, २७१ तसेच आपत्ती व्यवस्थापन दंडात्मक कायदा २००५ च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
Post a Comment