● सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेना, शेकापची युती तर भाजप किमान सात ठिकाणी लढत देण्याची शक्यता.
म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
राज्यात होऊ घातलेल्या नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत म्हसळा नगर पंचायतीची निवडणूक चुरशीची होण्यासाठी आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी काँग्रेस आय, शिवसेना आणि शेकापची युती पक्की झाली आसुन 17 सदस्य संख्या असलेल्या म्हसळा नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस 9 तर शिवसेना 8 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. म्हसळा शहरात शेकापचे विशेष प्राबल्य नसल्याने आवश्यक वाटल्यास शिवसेनेच्या कोट्यातील एखादी जागा शेकापला सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. समिश्र लोकवस्ती असलेल्या म्हसळा शहरात भाजप हिंदुलोकवस्ती असलेल्या किमान 7 प्रभागातील जागा स्वबळावर निवडणूक लढवेल असे निदर्शनास येत आहे. भाजपा ज्या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करेल त्या मध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 14, 15, 16, 17, 12, 13, 4,या प्रभागाचा समावेश आहे. अनेक ठिकाणी आरक्षण असल्याने आणि आरक्षित उमेदवार उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी लढत देण्याची तयारी असुनही निवडणूक लढवू शकत नसल्याचे समजते. मागील पाच वर्षे सत्तेत असलेली
राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत 17 जागेवर जोरदार लढत देण्यासाठी सज्ज झाली असुन सुरुवातीलाच दोन जागा बिनविरोध येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर किमान आठ ते दहा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस एकतर्फी विजय मिळवू शकतो अशीच परिस्थिती दिसुन येत आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला सहज विजय न मिळवून देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि शेकाप यांनी युतीचे माध्यमातून लढत देण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यात आघाडीचा सरकार असला तरी स्थानिक पातळीवर आघाडीमध्ये पटत नसल्याने निवडणूक आणि पक्षाची ताकद किती याचे सरळ मोजमाप होणार आहे.
म्हसळा शहरात काँग्रेस मध्ये मतमतांतरे असुन बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांना मानणारी जुनी शहरातील कार्यकारणी आणि दुसरी नव्याने आघाडी सरकारमध्ये काम करत असलेली नवनियुक्त तालुका व शहर कार्यकारणी यांच्यात पक्ष पातळीवर कोणताच संवाद होत नसल्याने काँग्रेसही म्हसळा निवडणुकीत संभ्रम स्थितीत आहे. सद्यस्थितीत नव्याने स्थापित असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पक्षाची सर्व सूत्रे जिल्हा काँग्रेस कार्यकारणी आणि महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील जिल्हा संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हाती देवुन कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत त्या नुसार म्हसळा नगर पंचायतीत निवडणुकीचे काम सुरू झाले आहे. युतीच्या 9 जागेपैकी काँग्रेस कोणकोणते उमेदवार उभे करणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. म्हसळा नगर पंचायतीत मागील वेळी 3 अपक्ष नगरसेवक निवडणून आले होते या वेळी काही ठिकाणी असा प्रयोग होण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी पाडापाडीचे राजकारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे राहून आपले पक्षाला फायदा होईल असे राजकारण होऊ शकते.
तीन दिवसांत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही...
दिनांक 1 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी गेले तीन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी माहिती देताना सांगितले. दिनांक 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांना त्यांचा नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. असे असले तरी इच्छुक उमेदवार व सुचक यांना म्हसळा नगर पंचायतीत सकाळी 11 ते 3 या वेळेत थकीत मिळकत कर भरून दाखला घेता येणार असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले आहे.
Post a Comment