कोव्हिड 19 लसीकरण आणि ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात बैठक



नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता - तहसीलदार समीर घारे

म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर

    भारतासह संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या कोरोना रोगाचे विषाणू व नुकताच नव्याने आलेला ओमीक्रॉन व्हेरियंट विषाणूच्या पार्श्वभूमीवर घेण्याची खबरदारी व उपाययोजनाबाबत मंगळवार, दि.30 नोव्हेंबर2021 रोजी म्हसळा तहसीलदार कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
     यावेळी आयोजित सभेला तहसिलदार समीर घारे यांसह नायब तहसिलदार के.टी.भिंगारे, पीएसआय रविंद्र सूर्यवंशी, दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत पालवणकर, एबाविप्र अधिकारी वैष्णवी कलबासकर, कनिष्ठ सहायक राजेश कासरूंग, लिपिक आर. कोसबे, एमओ डॉ.प्रियांका देशमुख, टीएचओ आय.पी.पाणगे, तालुका कृषी अधिकारी सुजय कुसळकर, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, इंजिनिअर किरण धनावडे, युडीसी योगेश गायकवाड, बीएसएनएल ज्युनिअर इंजिनिअर अख्तर खान, असिस्टंट बिडीओ राजेश कदम, टीएचओ प्रशांत गायकवाड, यांसह तहसील कार्यालयातील भोईर, रणदिवे असे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
   मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीशी लढा देत असताना जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र शासनाने लसीकरण करून आता काही दिवसांपासून कोरोना विषाणूंचा कहर कमी झालेला कुठेतरी पाहायला मिळत आहे. काही प्रमाणात कोरोना पासून सुटका झाल्याची पहायला मिळत असतानाच आता नव्याने कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंटचे आगमन होत असल्याने म्हसळा तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्यात प्रशासनाच्या माध्यमातून खबरदारी म्हणून सरकारी कर्मचारी व  नागरिकांना मास्क वापरणे सक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी, दुकानदार, चहा टपरी, हॉटेल, रिक्षावाले, खाजगी वाहतूकदार, सर्व सरकारी कार्यालये, आदी ठिकाणी जनजागृती करण्याची सुरुवात झाली आहे. 
      आयोजित सभेत संबोधित करताना तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले की गाव, वाडीवस्ती वर सर्वांनी लस घेणे गरजेचे असून कोणतेही शासकीय दाखले हवे असतील तर लस घेणे गरजेचे आहे. तसेच कोणीही लसीबाबत चुकीचे गैरसमज पसवरवू नयेत अन्यथा कायदेशीररित्या गुन्हे दाखल केले जातील असे सांगून तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांनी आपआपल्या कार्यालय प्रमुखांकडे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दि.05 डिसेंबर पर्यत जमा करावेत जर 05 डिसेंबर पर्यत प्रमाणात जमा केले नाहीत तर 06 डिसेंबर पासून एक महिन्याचा पगार थांबविण्याची कार्यवाही केली जाईल असा इशारा तहसीलदारांनी सरकारी कर्मचारी वर्गाला दिला आहे. तसेच तालुक्यातील सर्व सरकारी कर्मचारी, आस्थापणाचे कर्मचारी, सरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामस्थ मंडळ अध्य, पोलीस पाटील, आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, युवक मंडळे या सर्वांनी ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे असे सांगून सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असून ग्रामदक्षता समिती बरोबरच सर्वांना सोबत घेऊन तालुक्यात जनजागृती करण्याचे काम पुन्हा सुरू करावे.
अद्याप पर्यंत जर कोणतेही नागरिकांनी लसीकरण केलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे तसेच जर कोणी मास्क चा वापर केला नाही तर शासनाने नेमून दिलेल्या गाईड लाईन नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार समीर घारे यांनी दिले असून नागरिकांनी ही आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हाहन म्हसळा तहसीलदार समीर घारे यांनी केले आहे.
सोबत फोटो : तहसीलदार यांचे दालनात आयोजित सभेत संबोधित करताना तहसीलदार समीर घारे व सरकारी अधिकारी कर्मचारी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा