रोहा (वार्ताहर)
कोरोनाच्या अत्यंत आव्हानात्मक काळात रोह्यातील सर्व कोव्हिडयोद्ध्यांनी केलेले काम अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे मत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहे येथे भाटे सार्वजनिक वाचनालय आयोजित कोव्हिडयोद्धा सन्मान सोहळ्यात बोलतांना व्यक्त केले.
शतकोत्तर यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे शारदोत्सवानिमित्त कोव्हिडकाळात सेवाभावी व्रुत्तीने रोहेकरांना उत्तम सेवा देणाऱ्या व्यक्तींचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते कोव्हिडयोद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, गटनेते महेंद्र गुजर, भाटे वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे, पोलिस निरीक्षक संजय पाटील, उपजिल्हा रुग्णालय रोहाच्या अधिष्ठाता डॉ. अंकिता खैरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाटे वाचनालयाचे अध्यक्ष श्री. किशोर तावडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व या कार्यक्रमाच्या नियोजनामागचा उद्देश विशद केला.
या सोहळ्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय रोहाचा सर्व स्टाफ, रोहा पोलिस स्टेशनचा स्टाफ, सर्व केमिस्ट बांधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पत्रकार,जनकल्याण समिती सदस्य,नगरपरिषद सफाई कर्मचारी,शहरात सेवाभावी व्रुत्तीने उत्तम सेवा देणारे आदित्य कोंडाळकर आणि राजेश काफरे आदींना कोव्हिडयोद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सदर सोहळ्याचे सुत्र संचलन निखिल दाते यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष किशोर तावडे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष वसंत भट, सह कार्यवाह महेश कुलकर्णी, संचालक महेंद्र मोरे, राजेश देशमुख आदींसह सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment