भाजपचा १ नोव्हेंबरला रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
माणगाव प्रतिनिधी
माणगाव बस स्थानकाची अत्यंत दूरवस्था झाली असून या स्थानकात जागोजागी मोठमोठे प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यात पावसामुळे या खड्ड्यातून पाणी साचून त्याची तळी झाल्याचे चित्र पहायला मिळते आहे.
स्थानकात येणार्या बसेस झोला मारत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. याविरोधात भाजपचे तालुका अध्यक्ष संजय ढवळे यांनी आक्रमक भूमिका घेत १ नोव्हेंबरला स्थानकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या या आंदोलनास माणगाव तालुका पत्रकार संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख यांनी सांगितले.
माणगाव हे दक्षिण रायगडातील मध्यवर्ती असे महत्त्वाचे ठिकाण आहे येथे एसटी बस आगार व्हावे, यासाठी माणगाव तालुका पत्रकार संघाने १ मे २००० रोजी उपोषण केले होते. त्यानंतर येथील बस आगाराचे काम मार्गी लागले. येथे आगार झाल्यावर येथील स्थानकात प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील असे वाटत होते. परंतु साधे पिण्याचे पाणी प्रवाशांना मिळत नाही. बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून बसस्थानकासमोर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचले आहे.
या समस्येकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे. कोणी येथील खड्ड्यांबाबत आवाज उठविल्यास तेवढ्याच पुरती डागडुजी करण्यात येते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिक, प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Post a Comment