- रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचे चाकरमान्यांना आवाहन
- बंधनकारक नाही, पण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी
टिम म्हसळा लाईव्ह
कोरोनाचे संकट अद्यापही आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस झाले नसतील, तर 72 तास आधी आरटीपीसीआर किंवा अँटीजन तपासणी करुन यावे, असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. यासाठी सक्ती असणार नाही, मात्र आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सव 2021 पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी (1 सप्टेंबर) रोजी अलिबाग येथील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. त्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव निमित्तसध्या कोणतेही निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून लावलेले नाहीत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभावना वर्तवली आहे. त्यामुळे पुढील संभाव्य धोका ओळखून काही उपाययोजना केल्यास तिसर्या लाटेपासून आपण वाचू शकतो. यासाठी गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमानी भक्तांनी लसीचे दोन डोस घ्यावेत; अन्यथा आरटीपीसीआर किंवा अँटीजन तपासणी करून यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी कोणतीही सक्ती केलेली नसली तरी स्वतःच्या आणि गावाकडील कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. यासाठी हे आवाहन करीत असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बैठकीतील महत्वाचे मुद्दे :
- राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना रस्ते दुरूस्ती, रिफ्लेक्टर बसविणे, दिशादर्शक फलक लावणे, आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन, डंपर सज्ज ठेवण्याचे निर्देश.
- ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे त्वरीत सुरू करावेत. ज्या ग्रामपंचायतींना अद्याप वीजमीटर बसविण्यात आलेले नाहीत, त्या ग्रामपंचायतींशी समन्वय साधून वीजमीटर बसवून द्यावेत. महावितरणच्या अधिकार्यांना सूचना.
- राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांना पालकमंत्री ग्रामीण भागात ज्या ठिकाणी एसटीच्या फेर्या बंद पडल्या आहेत, त्याबाबतीत आढावा घेऊन त्या फेर्या पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणार्या भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी आपली असल्याने या काळात कोविड चाचणी व कोविड लसीकरण वाढवावे.
- सण-उत्सवाच्या काळात काही व्यापारी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात. त्यांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी तपासणी मोहीम घेऊन अशा प्रकारे खाद्यपदार्थ, प्रसाद यामध्ये भेसळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागांने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत सुरू राहील, अपघात होणार नाही, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, बंदोबस्त चोख ठेवावा.
- गणेशोत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक यंत्रणेने आपापसात योग्य तो समन्वय राखावा, प्रत्येक विभागाने आपापली भूमिका जबाबदारीने पार पाडावी.
Post a Comment