आम्ही समाजाचे देणे लागतो उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण

 आम्ही समाजाचे देणे लागतो उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण





पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी साहित्यसंपदा ,शिवधारा ट्रेकर्स ,तेजस्विनी सांस्कृतिक आणि सामाजिक फाउंडेशन अलिबाग आणि नादब्रह्म एक स्वराविष्कार गिरगांव ह्यांच्या संयुक्त विद्यमाने "आम्ही समाजाचे देणे लागतो " उपक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला .साहित्य कला सांस्कृतिक सामाजिक  क्षेत्रातील संस्थांच्या  ह्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे .केवळ आपल्या क्षेत्रापूर्ती मर्यादित न राहता सामाजिक भान जपण्यासाठी एकत्र येऊन केलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देताना सर्व दात्यांचे ,उपक्रमातील सहभागी समन्वयकांचे ,नियोजकांचे आभार सदर प्रसंगी मानण्यात आले .

साहित्यसंपदातर्फे  लालसिंग वैराट ,सुनील मत्रे ,पूनम धनावडे  ,यश पाटील ,सिद्धी गुंड  ह्यांनी दुर्गम भागात प्रत्यक्ष मदत पोहचवण्यास मदत केली .दरड कोसळल्याने संपर्क तुटलेल्या गावांना मदत पोहचवताना माणुसकीचे उत्तम दर्शन समूहातर्फे दाखविण्यात आले .समन्वयक म्हणून किसन पेडणेकर ,स्मिता  हर्डीकर ,सोनाली शेडे ,अश्विनी केंजाळे ह्यांनी काम पहिले .

प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार   (उपजिल्हाधिकारी रायगड) तहसिलदार पोलादपूर, जिल्हा पुरवठा अधिकारी(District supply officer) ह्यांच्या उपस्थितीत गरजूंना  मदतीचे वाटप रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे ह्यांच्या हस्ते करण्यात आले .अन्न धान्य ,पाणी ,सॅनेटरी पॅड्स ,कपडे  आणि इतर दैनंदिन गरजेच्या  वस्तू ह्यांचा समावेश ह्यात होता .500 हून अधिक कुटुंबाना प्रत्यक्षरित्या मदत पोहचविण्यात आली .

पोलादपूर शहर ,महाड ,रानबिजरे आदिवासी वाडी, भराववाडी, राखीचा टोक, सुतारपेढा, कोसमवाडी  कुंबलवणी,  चिरेखिंड, सुतार पेढावाडा कुंबरोशी आदी आणि इतर गावांना मदत पोहचविण्यात आली .

तेजस्विनी सांस्कृतिक आणि सामाजिक फाऊंडेशन अलिबाग संस्थापिका जीविता पाटील ह्यांनी मोठया प्रमाणात पूरग्रस्तांसाठी वस्तू स्वरूपात मदत उभारण्यास मदत केली .सदर मदत  हातोहाती पोहचवण्यास त्यांनी मोठे योगदान दिले .पेण मधील सुप्रसिद्ध व्यावसायिक अलंकार साळुंखे ह्यांनी अष्टविनायक रोडलाईन्सच्या माध्यमातून जमा झालेली मदत किट स्वरूपात विनामूल्य बनविण्यास मदत केली  .रेणुका साळुंखे ,श्रद्धा पिसाट, भावनेश मोकल,रेश्मा कडू ,सागर साळुंखे ह्यांनी जमा झालेल्या मदतीचे वर्गीकरण करून दैनंदिन जीवनास लागणाऱ्या अन्नधान्य आणि वस्तूंचे किट बनवले .

विशेष म्हणजे फक्त साहित्यिकच नाही तर ट्रेकिंग क्षेत्रातील संस्था सुद्धा सदर उपक्रमात अग्रेसर होत्या .ट्रेकिंग मध्ये नावाजलेली राहुल तवटे संस्थापित शिवधारा ट्रेकर्स  संस्थेने मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात मदत गोळा करण्यास हातभार लावला .नियोजनाची सर्व जवाबदारी त्यांनी यशवीरित्या पार पाडली .ओंकार पवार, मेहुल पटेल, ओंकार वर्तक (team India Outdoor) ह्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवून मदत घरोघर पोहचवण्यास  हातभार लावला .नादब्रह्म एक स्वराविष्कार (गिरगांव) संस्थेने सुद्धा  सदर उपक्रमात आपले योगदान नोंदवताना पूरग्रस्तांना निधी उभारण्यास मदत केली .

उपक्रमाची सांगता छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या कवड्यांच्या माळीच्या दर्शनाने झाली ,ही माळ नरवीर तान्हाजी मालुसरे ह्यांना अखेरच्या क्षणी महाराजांनी अर्पण केली होती .

नरवीर तान्हाजी मालुसरे ह्यांच्या वंशज डॉ.शीतलताई मालुसरे ह्यांच्या   सदिच्छा भेटी दरम्यान,थोर विभूतींना नमन करून गरजूंना वेळोवेळी मदत करण्याचे सामर्थ्य सदैव अंगी राहावे असे मनोगत व्यक्त करण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा