राम सिताराम लोणेरे
उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथील आय. पी. एच. एस. अंतर्गत विशेषतज्ञ म्हणून पाच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना ९ महिन्यांचे मानधन अदा करण्यात आले होते. मात्र हे मानधन परताव्याचे आदेश देण्यात आल्याने हे डॉक्टर संताप व्यक्त करीत आहेत.
डॉ. संतोष कामेरकर, डॉ. जगदीश पटेल, डॉ. बी. एस. सावंत, डॉ. सिद्धी कामेरकर, डॉ. श्रुती निकम हे कार्यरत होते. या पाचही डॉक्टरांची नियुक्ती कायदेशीर मार्गाने उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे केली होती. हे सर्व डॉक्टर ३१ मार्च २०२० पर्यंत उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे कार्यरत होते. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंतचे मानधन त्यांना देण्यात आलेले नव्हते. त्यांनी पालकमंत्री आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्याकडे याची तक्रार केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये प्रलंबित मानधन अंशतः एप्रिल २०२० मध्ये अदा करण्यात आले.
त्यांचे तब्बल तेच ९ महिन्यांचे मानधन एन. एच. एम ने दि. १७ जून २०२१ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात परत मागितले आहे.
रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माणगांवमध्ये उपजिल्हा रुग्णालय हे कोरोना काळातही जनतेला उपचारासाठी वरदान ठरलेले आहे. मात्र सध्या या ठिकाणी महिला प्रसूती सेवा होत नसल्याने प्रसूतीसाठी महिलांना खाजगी रुग्णालयात जाऊन अनाठायी खर्च सोसावा लागत आहे. तसेच डॉ. संतोष कामेरकर, डॉ. जगदीश पटेल, डॉ. बी. एस. सावंत, डॉ. सिद्धी कामेरकर, डॉ. श्रुती निकम यांनी पुनर्नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर केला असून तो प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. या पाच ही डॉक्टरांनी त्यांच्या मागील कार्यकाळात उत्तम आरोग्य सेवा दिलेली होती. त्यांचे काही मानधन येणे बाकी असून सुद्धा ते पुढे काम करण्यास तयार आहेत असे असताना त्यांना पून्हा नियुक्तीचे आदेश देण्याऐवजी मानधन परतावायचे आदेश देण्यात आले आहेत.
या बाबत डॉ. संतोष कामेरकर यांनी सांगितले की, आम्ही उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी प्रामाणिकपणे सेवा दिलेली असून नेहमीच मानधन देण्यास विलंब होत असतो. मात्र पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही दिलेल्या सेवेचे अंशतः मानधन आम्हाला मिळाले. काही मानधन बाकी असताना सुद्धा आम्ही पुनर्नियुक्तीसाठी अर्ज केलेले आहेत. ते अर्ज सुद्धा प्रलंबित आहेत. असे असताना आम्हाला देण्यात आलेल्या मानधनाची वसुली लावल्यात आली. हा आमच्यावर अन्याय आहे.
उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे काही डॉक्टर काम न करता फुकटचा शासनाचा पगार घेत आहेत. अशा डॉक्टरांची तात्काळ माणगांव येथून बदली करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. तेथे असणारे दोन्ही स्त्री रोग व प्रसूती तज्ञ गेल्या दोन वर्षात कोणत्याही प्रकारचे सिझरिंग ऑपरेशन करीत नाहीत असे माहिती अधिकारात उघड झालेले आहे. या आमच्या वर होणाऱ्या अन्यायाबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत पत्र व्यवहार करून प्रत्यक्ष निवेदन देण्यात आली आहेत. या डॉक्टरांना लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
Post a Comment