टीम म्हसळा लाईव्ह
जिल्ह्यातील अलिबाग-मुरूड या राज्य महामार्गावरील काशिद पूल हा मुसळधार पावसामुळे वाहून गेला. या दूर्घटनाग्रस्त भागाची पालकमंत्री कु.आदिती तटकरे (Guardian Minister Ms. Aditi Tatkare) यांनी तत्परतेने काल (दि.12 जुलै) रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांना काशिद पुलाचे दुरुस्तीचे काम त्वरित करून हा रस्ता वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्यात यावा, अशा सूचना केल्या.
यावेळी पालकमंत्री कु.तटकरे यांच्यासमवेत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात तसेच बांधकाम विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या दूर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. त्याचप्रमाणे या दूर्घटनेत मुरूड तालुक्यातील एकदरा येथील वाहून गेलेले मयत श्री.विजय चव्हाण यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठीची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने तत्परतेने करावी, अशी सूचनाही स्थानिक प्रशासनाला दिली. यावेळी पालकमंत्री कु.तटकरे यांनी या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या जखमींची आस्थेने विचारपूस केली तसेच काशिद गावातील जनतेबरोबर संवाद साधीत शासन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, हे शासन सर्वसामान्य जनतेचे आहे, त्यामुळे जनतेच्या ज्या अपेक्षा शासनाकडून आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे सांगितले. त्याचप्रमाणे काशिद चा पूल लवकरात लवकर तयार करून या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या.
Post a Comment