तळा कॉलेजमध्ये एक दिवसीय पुनर्रचित अभ्यासक्रम आभासी कार्यशाळेचे आयोजन



 तळा- किशोर पितळे

द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा ता.तळा व  मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.१३ जुलै २०२१ रोजी एक दिवसीय पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी केले.यावेळी बोलतांना त्यांनी मराठी विषयाचा बदललेला अभ्यासक्रमा विषयी आपली  भूमिका मांडताना सांगितले की, या नव्या अभ्यासक्रमामध्ये नव्यानेच आधुनिक तंत्रज्ञान परिचय व प्रात्यक्षिक – पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, युनिकोड टंकलेखन, ई मेल लेखन, ब्लॉगलेखन आणि विकिपिडीयासाठी लेखन  आणि स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण यांचा समावेश करण्यात आलेला आहे.सद्या तंत्रज्ञानाचे युग आहे आणि यामध्ये मराठी साहित्य आणि भाषा हे अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमांची गरज निर्माण झालेली आहे तसेच विद्यार्थ्यांना नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील. ही गरज ओळखून मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाने हा  अभ्यासक्रम तयार केलेला आहे. या अभ्यासक्रमाचे स्वागत नक्कीच प्राध्यापक आणि विद्यार्थी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यशाळेस अध्यक्ष तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. मंगेश देशमुख लाभले होते. कार्यशाळेस महावियालयाचे प्राचार्य डॉ. डॉ.कैलास निंबाळकर यांनी उपस्थित राहून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.कार्यशाळेचे समन्वयक डॉ.नानासाहेब शामराव यादव, सदस्य मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.या कार्यशाळेमध्ये निबंधवाचक म्हणून डॉ.निधी पटवर्धन गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी, विषय : आधुनिक तंत्रज्ञान परिचय व प्रात्यक्षिक- पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन व युनिकोड टंकलेखन, प्रा.प्रमोद शंकर पवार, पार्वतीबाई चौगुले स्वायत्त महाविद्यालय, मडगांव, गोवा, विषय : ईमेल लेखन, ब्लॉगलेखन आणि विकिपिडीयासाठी लेखन, डॉ.गोविंद काजरेकर, रावसाहेब गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सरस्वतीबाई गणेशशेठ वडके कॉलेज ऑफ आर्ट्स,बांदा ता.सावंतवाडी, विषय : मराठी व्याकरण (स्पर्धा परीक्षा) यांनी वरील विषयांवर अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. या सर्व सत्रांचे सत्राध्यक्ष : डॉ.नितीन आरेकर, सी.एच.एम.कॉलेज, उल्हासनगर यांनी आपल्या मनोगतात नवीन अभ्यासक्रमाचे स्वागत निक्कीच प्राध्यापक करतील असा विश्वास व्यक्त करत अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांना त्यांनी धन्यवाद दिले. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठ अभ्यासमंडळाचे सर्व सदस्य, द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी तसेच तळे विभाग शिक्षण प्रसारक  मंडळाचे कार्यकारी सदस्य, पदाधिकारी आणि यांनी सहकार्य केले.या सर्वांचे आभार डॉ.नानासाहेब यादव यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा