ठाणे – कोरोना संकट आल्यामुळे राज्यात सर्व सण आणि उत्सवांवर गेल्या वर्षापासून बंधने आली आहेत. दहीहंडीवरही गेल्यावर्षी गंडांतर आले होते. पण यावेळी मनसेने मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर यांची घोषणा केली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन 31 ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचे पानसे यांनी म्हटले आहे. ( Dahihandi will be celebrated this year)
अभिजीत पानसे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यंदा 31 ऑगस्टला दहीहंडी साजरी करणार आहोत. त्यासाठी अनेक मंडळांना आवाहन केले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करा. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचेही नाव नमूद केले आहे. मनसेच्या या आवाहनामुळे आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
Post a Comment