महाडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश



टीम  म्हसळा लाईव्ह 

जिल्ह्यातील महाड या तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने उद्भवलेल्या  पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे  तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा व जलदगतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. (Guardian Minister Aditi Tatkare instructs the administration to provide immediate relief to the flood victims in Mahad)

     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील महाड येथील पूरपरिस्थितीची पहाणी करुन पूरबाधितांना मदतकार्य पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या. 

     यावेळी खासदार सुनिल तटकरे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, स्थानिक प्रशासनातील इतर अधिकारी आदिंची उपस्थिती होती.

      पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या भागातील पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहोचवावी व स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य, औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा या सारख्या आवश्यक सर्व बाबी उपलब्ध करुन द्याव्यात तसेच जनावरांनाही आवश्यक पशुखाद्य आणि पाणी पुरवावे, अतिवृष्टीमुळे  खंडित झालेली दूरध्वनी सेवा आणि विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा, अशा सूचना दिल्या. तसेच या आपत्कालीन परिस्थितीवर मात करुन मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रीमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने पूरबाधितांना योग्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा