टीम म्हसळा लाईव्ह
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर श्रीवर्धन तालुक्यामध्ये (8 जुलै) दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. लावणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
भातशेतीत आलेले आवण लावणीयोग्य झाल्याने बहुतांश शेतकर्यांनी आपल्या शेतात नांगरणी करुन मातीची फोडदेखील करून ठेवली होती. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे लावणीची कामे खोळंबली. काही शेतकर्यांनी शेतात पाणी होते, तोपर्यंत लावणीचे काम केले. परंतु लावणी केलेले भात जगेल की करपून जाईल? या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. काही शेतकर्यांनी शेतामध्ये पाणीच नसल्यामुळे लावणीची कामे बाजूला ठेवली होती.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज दुपारपासून तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता शेतामध्ये पाणी तुंबून शेतकर्यांना लावणी करणे शक्य होणार आहे. पंचागीय शास्त्रानुसार सध्या पुष्य नक्षत्र सुरू आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून, उंदराला पाऊस कमी चालतो, असे बुजूर्ग लोक सांगतात. तर या नक्षत्राला पोरांचे नक्षत्र असेही म्हणतात. 19 जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्र निघत असून याचे वाहन घोडा आहे. या नक्षत्राला म्हातार्याचा पाऊस म्हणतात.
दोन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे कडक ऊन पडत होते. त्यामुळे हवेत उष्म्याचे प्रचंड प्रमाणात वाढले होते. पहिला पाऊस पडून गेलेला असल्यामुळे जमीन ओली होती. त्यामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता जास्त असल्याने उष्म्याच्या त्रासाबरोर घाम येण्याचा त्रासही नागरिकांना सोसावा लागत होता.आज दुपारपासून पावसाने मुसळधार सुरुवात केल्यामुळे हवेत चांगल्या प्रमाणात गारवा आला आहे. उष्म्याने त्रासलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तर शेतकर्यांचा जीवही भांड्यात पडला आहे.
Post a Comment