म्हसळ्यातील गोंडघर गावाजवळील घटना
डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल
टीम म्हसळा लाईव्ह
रस्त्याच्या कडेला ब्रेकडाऊन झाल्याने उभ्या केलेल्या डंपरला मोटारसायकल धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (1 जून) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडघर (ता. म्हसळा) गावाजवळ घडली.
अपघातातील दोघेही मृत मेंदडी आदिवासी वाडी येथील आहेत. बोर्लीपंचतन गावापासून 4 किमी अंतरावर असणार्या म्हसळा तालुक्यातील गोंडघर गावाशेजारील पेट्रोल पंपाजवळ डंपर ब्रेक डाऊन झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मेंदडीहून बोर्लीपंचतनकडे येणार्या मोटारसायकल चालकास हा डंपर दिसला नाही.
त्यामुळे मोटारसायकल या डंपरला जाऊन धडकली. या अपघातात मोटारसायकलवरील नरेश बबन जाधव व जनार्दन हरिश्चंद्र वाघे (दोघेही रा.मेंदडी आदिवासी वाडी) यांचा गंभीर जखम झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर महेश (रा. वारळ आदिवासी वाडी) नामक व्यक्ती जखमी झाली आहे.
दरम्यान, या अपघातप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधासह मोटारवाहन कायद्यावये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमाण करीत आहेत.
Post a Comment