शबिस्ता सरखोत यांनी घेतला पुढाकार, साहित्यांच्या माध्यमातून केली दीड लाखांची मदत
श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
आज कोरोना महामारीच्या काळात गेली दीड वर्षे आपला देश झुंज देत आहे. ह्या कोरोना संकटामध्ये देवदूत म्हणून आरोग्य कर्मचारी, पोलिस, प्रशासन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनाच्या संकटांना निस्तनाभूत करण्यासाठी सर्व जनता शासनाला सहकार्य करत आहे. त्याच जनतेतून काही दिलदार व्यक्तिमत्त्वाचे नागरीक मदतीचा हात पुढे करत आहेत.
अशाच प्रकारे आज उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन येथे श्रीवर्धनच्या नगरसेविका शबिस्ता सरखोत यांनी वैद्यकीय कर्मचारी व रुग्णांना लागणाऱ्या साहित्यांचे वाटप केले. त्यामध्ये बाथपॅप मशीन, बेडशीट विथ पिलो कवर, टॉवेल, शुगर टेस्ट मशीन, हायफ्लो ऑक्सिजन मास्क, हॅन्ड ग्लोज, डिस्पोजेबल अँप्रोन,डिस्पोजेबल मास्क, पी पी ई किट, इंजेक्शन अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सदरचे वाटपा प्रसंगी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांनी नागरिकांना आवाहन केले की, सद्यस्थितीत श्रीवर्धन तालुक्याची परिस्थिती पाहता कोरोना रुग्णांचा वाढता आलेख दिसून येत आहे. त्या कारणास्तव प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गेले दीड वर्षे आरोग्य कर्मचारी यांनी रात्रंदिवस सतर्कतेने भूमिका बजावली त्याबद्दल मी त्यांचे श्रीवर्धन वासियांकडून आभार व्यक्त करतो. असे वक्तव्य तहसीलदार सचिन गोसावी यांनी केले.
उपजिल्हा रुग्णालय सर्व सोयीसुविधांनी सज्ज आहे. रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी सदैव कटिबद्ध आहेत. आज पर्यंत इथून ९२७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे यांनी सांगितले.
कोरोना काळात केलेल्या मदतीची संधी मला मिळाली याबद्दल मला समाधान वाटत आहे. लवकरात लवकर कोरोनाचे संकट निर्मूलन व्हावे अशी आशा व्यक्त करते व सर्व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे आभार मानावेसे वाटते. असे प्रतिपादन श्रीवर्धनच्या नगरसेविका शबिस्ता सरखोत यांनी केले. सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे, डॉ. महेंद्र भरणे, पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर, नायब तहसीलदार विपुल ढुमे व नगरसेविका शबिस्ता सरखोत उपस्थित होते.
Post a Comment