जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ९२४ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले




टीम म्हसळा लाईव्ह 
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ९२४ करोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले असून, यामधील ७६ हजार २५२ लाभार्थ्यांना लसीचे दोनही डोस म्हणजे १ लाख ५२ हजार ५०४ डोस देण्यात आले आहेत. तर २ लाख २५ हजार ४२० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस उपयुक्त असून सर्व पात्र नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
     जानेवारी 2021 या महिन्यापासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंट लाईन वर्कर्स, ६० वर्षांवरील नागरिक तसेच ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा सुरू असताना १८ ते ४४ वर्षांपर्यंत नागरिकांचे लसीकरण हाती घेण्यात आले.
    रायगड जिल्ह्याला आत्तापर्यंत ३ लाख ७९ हजार ४५० लस प्राप्त झाली. यामध्ये कोव्हीशिल्ड कंपनीच्या ३ लाख ५५ हजार तर कोव्हॅक्सीन कंपनीच्या ५२ हजार २०० लसी प्राप्त झाल्या. लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात १८९ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्राप्त लसींपैकी ३ लाख ७७ हजार ९२४ लसींचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले असून, १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना २१ हजार ९०१ तर फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना ३ लाख ५६ हजार १५ लसीचे डोस देण्यात आले असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

    जिल्ह्यात १८९ लसीकरण केंद्रे
    रायगड जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी १८९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांमध्ये १५८ लसीकरण केंद्र सुरू आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांच्या अखत्यारीत १७ तर पनवेल महानगर पालिकेच्या अखत्यारीत १४ लसीकरण केंद्रे सुरू आहेत.
      जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ९२४ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या निवडक उपकेंद्रांवर सुमारे १ लाख २६ हजार ५१५ लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रांवर १ लाख ९ हजार ६६२ तर पनवेल महानगर पालिकेच्या केंद्रांवर ८५ हजार ३९४ तर खासगी लसीकरण केंद्रांवर ५६ हजार ३५३ लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.
    
जिल्ह्यातील करोना लसीकरण मोहीम दृष्टीक्षेप
लसीकरण केंद्रे : १८९
वितरीत लस : ३ लाख ७९ हजार ४५०
एकूण लसीकरण : ३ लाख ७७ हजार ९२४
दोनही डोस घेतलेले लाभार्थी : ७६ हजार २५२
केवळ एक डोस घेतलेले लाभार्थी : २ लाख २५ हजार ४२०

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा