कोविडमुळे पालकांचे निधन झालेल्या मुलांसाठी जिल्हा कृती दल व हेल्पलाईन कार्यान्वित


जिल्हा कृतीदलाच्या संपर्ककार्याच्या पोस्टरचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते अनावरण



टीम म्हसळा लाईव्ह

कोविड-19 या रोगाचा वाढलेल्या संसर्गामुळे बाधित व्यक्तींचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, यामुळे झालेले दोन्ही पालकांचे निधन व अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पालक नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा बालतस्करीसारख्या गुन्हयामध्ये ओढली जाण्याची शक्यता निर्माण होते. 
     अशा मुलांकरीता रायगड जिल्हयात महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे.  हे जिल्हा कृती दल दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणाची जबाबदारी घेणार असून या जिल्हा कृती दलाच्या व बालगृहांच्या संपर्क क्रमांकाच्या स्टिकर्सचे अनावरण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
   यावेळी उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के- पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील व मैथिली भगत हे उपस्थित होते.
    हे स्टिकर्स जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले आहेत. 
      शासन निर्णयानुसार विविध शासकीय विभागांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.    
     स्वत: जिल्हाधिकारी हे जिल्हा कृती दलाच्या कामावर नियंत्रण ठेवून सदस्यांकडून आवश्यक माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देणार असून दर 15 दिवसांनी या जिल्हा कृती दलाच्या कामकाजाचा आढावा घेतील.
       पोलीस अधीक्षक हे कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना संरक्षण उपलब्ध करून देतील व ती बालके शोषणास बळी पडणार नाहीत, याची दक्षता घेऊन अशा मुलांच्या दत्तक विधानाबाबत समाजामध्ये चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करतील.
        जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अशा बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत कार्यवाही करतील तसेच न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देतील त्याचप्रमाणे अशा बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित ठेवण्याची दक्षता घेतील.
       बाल कल्याण समितीचे   अध्यक्ष हे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांस बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याबाबत व अशा मुलांचा ताबा नातेवाईकाकडे देण्याची शक्यता पडताळून पाहतील. तसेच दत्तक प्रक्रियेसाठी आवश्यकता असल्यास करावयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करतील. बालकांस समुपदेशनाची व्यवस्था उपलब्ध करून देतील किंवा बालकांस बालगृहामध्ये दाखल करून घेण्याबाबतचे आदेश देतील.
    जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी कोणतीही व्यक्ती कोविड आजारावरील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होतेवेळी आपल्या बालकांचा ताबा कोणाकडे दयावा, याबाबत पालकांकडून माहिती भरुन घेण्याचे निर्देश त्यांच्या क्षेत्रातील सर्व रुग्णालयांना देतील. चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतचा माहिती फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावून घेण्याची दक्षता घेतील. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रात असणाऱ्या कार्यरत बाल निरीक्षणगृहाकरिता उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करतील.
       चाईल्ड लाईन ही यंत्रणा त्यांच्याकडे हेल्पलाइन नंबरवर आलेल्या फोन कॉल नुसार अनाथ बालकांची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास देतील व त्यांच्याशी योग्य समन्वय ठेवतील.   
       जिल्हा माहिती अधिकारी हे चाईल्ड हेल्पलाईन व कृतीदल / Task Force च्या कामांना जिल्हयामध्ये व्यापक प्रसिध्दी देतील. 
       जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे कृतीलदल / Task Force चे समन्वयक म्हणून काम पाहतील.  
         जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संबंधित यंत्रणेकडून माहिती दर आठवड्याला प्राप्त करून घेऊन आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांना सादर करतील.
     जिल्हा कृतीदलाची (Task force) कार्यप्रणाली अशी असून जिल्हयातील सर्व कोविड सेंटर, जम्बो कोविड सेंटर, शासकीय/ खाजगी दवाखाने या ठिकाणी या कृतीदलाच्या माहितीचे व संपर्क क्रमांकांचे स्टिकर दर्शनी भागात लावण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 
     या स्टिकर्सवरील संदेशानुसार जिल्हयातील नागरिकांनी कोविड आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या अशा बालकांची माहिती 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर उपलब्ध करून द्यावी, जिल्ह्यात कुठेही अशी बालके असतील, तर तात्काळ या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा