दि. 01 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी : मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश जारी


टीम म्हसळा  लाईव्ह 

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरीता केंद्र शासनाने आदेश निर्गमित केले आहेत.

      त्यानुषंगाने, मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित केला आहे. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी) किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहत नाही.

      राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 कलम 14 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. दि.01 जून 2021 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना दि. 01 जून 2021 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील. त्यामुळे सर्व मासेमारी नौका दि. 31 मे, 2021 वा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील याबाबत संबंधित नौकामालकांनी नोंद घ्यावी.

     या आदेशानुसार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, तसेच अधिक माहितीसाठी 02141-224221 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुरेश भारती यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा