श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
आज दि. २४ मे रोजी श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महागाई विरोधात श्रीवर्धन तहसिलदारांना निवेदन दिले आहे. वाढत्या कोरोना महामारीमध्ये तसेच झालेला तौक्ते व मागच्या वर्षीच्या वादळाने नुकसान झाल्याने अगोदरच जनतेची आर्थिक परिस्थिती विस्कटलेली असताना जनतेला पेट्रोल डिझेल व गॅस तसेच खतांची दरवाढ अशा बाबींना आर्थिक दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खालावलेली दिसून येते.
संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलची अफाट दरवाढ ही परवडणारी नाही त्यावर केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करावा. त्यासोबत स्वयंपाक घरातील गॅस भरमसाठ किमतीने वाढवल्याने गरीब जनतेचे आर्थिक गणित विस्कटलेले आहे. असे वक्तव्य रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महंमद मेमन यांनी केले.
वीज ग्राहकांना अंदाजी पाठवलेली वीज बिले ही समजण्यापलीकडे असून वीज बिले भरली नाहीत तर सबब न ऐकता त्यांची वीज जोडणी तोडली जात आहे तरी ही दंडेलशाही थांबवावी. त्याच सोबत बळीराजाच्या शेतातल्या पिकांना लागणारे खतांच्या किमंती प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेतात पीक घेणे हे बळीराजाला आव्हानात्मक झाले आहे. अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमंती ताबडतोब कमी कराव्यात असे मत महंमद मेमन यांनी व्यक्त केले.
दररोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढीने खाजगी वाहनांचे भाव वाढलेले आहेत. गरीब जनतेला खिशाला परवडत नसल्याने त्यांना दळणवळणासाठी अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. या कारणाने नागरिकांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याचे दिसून येते.
निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याने वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तौक्ते वादळाने कोकणातील उध्वस्त केलेल्या नुकसानग्रस्तांना अक्षरक्ष: मा. पंतप्रधानांनी दाखवलेला दुजाभाव ही कोणालाही न पटलेली गोष्ट आहे. गुजरातमधील नुकसानग्रस्तांना भरभरून केलेली मदत कोकणातील नुकसानग्रस्तांना दाखवलेला दुजाभाव असून महाराष्ट्रावर अन्याय आहे. त्यांना भरपाई मिळालेच पाहिजे. असे प्रतिपादन मोहम्मद मेमन यांनी केले.
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उपाध्यक्ष महंमद मेमन यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दर्शन विचारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांनी निवेदन स्वीकारले व शासनाला हे निवेदन सादर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
Post a Comment