"ताउत्के" चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर
"ताउत्के" चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील आणि तालुक्यांवर पडला असून जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या नुकसानीत अंदाजे किती रुपयांचे नुकसान झाले आहे, याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही अद्याप सुरू आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 43.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांना चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
जिल्ह्यातील 6 हजार 26 घरांचे अंशत: नुकसान तर 10 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, 7 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. कोणतीही व्यक्ती हरविल्याची नोंद नाही. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.
महावितरणच्या एकूण 168 HT पोलचे, 426 LT पोलचे तर 12 ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे.
यामुळे जिल्ह्यातील 661 गावातील (लोकसंख्या अंदाजे 1 लक्ष 6 हजार) वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.
चक्रीवादळामुळे विविध ठिकाणी झाडे/ झाडाच्या फांद्या पडल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे बंद झालेले रस्ते मोकळे करण्याची कार्यवाही प्रशासनाने तात्काळ केल्यामुळे सद्य:स्थितीत कोणतेही रस्ते बंद नाहीत.
जिल्ह्यातील मच्छीमारांच्या 125 जाळ्यांचे व 150 बोटींचे अंशतः नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अंदाजे 5 हजार हेक्टर.आर शेतजमिनीचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने आंबा, नारळ, भातशेती यांचा समावेश आहे. मात्र निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे यावेळी झाडांचे नुकसान न होता फक्त फळांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Post a Comment