"स्वामी" तर्फे रोगप्रतिकारक शक्तीवर्धक साहित्यांचे वाटप



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "स्वामी संस्था"  परळ यांच्या तर्फे मु. पो. कवठेवाडी, पोस्ट - कशेळे, तालुका - कर्जत, जिल्हा - रायगड येथील दुर्गम आदिवासी पाड्यातील गरीब व गरजू रहिवाशांची शारीरीक तपासणी करण्यात आली. रुग्ण सेवा केंद्राच्या  विधायक उपक्रमांतर्गत पाड्यातील सार्वत्रिक परिस्थितीचा विचार करता त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरोघरी शक्तीवर्धक औषधे व नाकाने वाफ घेण्याचे यंत्र आवश्यक आहे, असे आढळून आले. त्याप्रमाणे संस्थेकडून काही मदत करण्यात येईल का? याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. सदर आवाहन करण्यात आले असता, या उपक्रमास खूप सकारात्मक प्रतिसाद लाभला. 
दुर्गम पाड्यातील आदिवासींना आपल्या आरोग्याची काळजी तसेच बालकांचे संगोपन - उपचार याबाबत माहिती देण्यात आली. पाड्यातील आबालवृद्ध व समस्याग्रस्त महिला यांची यात प्राधान्याने दखल घेण्यात आली होती. त्यांच्या घरोघरी जाऊन मदत दिल्यास सुदृढ आणि आरामदायी जीवन स्वास्थ्यासाठी त्यांना सजग करता येईल, यासाठी दातृत्वाची हाक देण्यात आली.
सदर उपक्रमाची आस्थेने दखल घेऊन त्याप्रमाणे एकशे चाळीस आदिवासी कुटुंबांना विक्रांत गजानन माटे यांच्या सौजन्याने वेपोरायझर मशीन (वाफ घेण्याचे यंत्र) तसेच योगेश खेमकर यांच्या सौजन्याने सी व्हिटॅमिन पावडरचे पाकीट असे साहित्य कोरोनाशी लढण्यासाठी पाठवण्यात आले.
सदर साहित्यांचे वाटप तेथील कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केले. त्यांच्या तब्बेतीला आराम पडावा, यासाठी आगाऊ काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तत्पर सेवा आणि सुनियोजीत कार्यप्रणालीमुळे तेथील ग्रामस्थांना ही स्नेहभेट उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमाचे चोख नियोजन करण्यासाठी ज्यांचे उस्फूर्तपणे बहुमोल सहकार्य लाभले, त्यांच्या सेवा वृत्त्तीला सादर प्रणाम! देणगीदार, हितचिंतक, कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, ट्रस्ट स्वामी संस्थेच्या अशा उपक्रमांना सहाय्य देऊन यथाशक्ती मदत करतात. त्यामुळे पुण्यकर्म कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतो. 
"स्वामी संस्थे"च्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोहनजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित पद्घतीने  उपरोक्त साहित्य कर्जत येथे रवाना केले. शिस्तबध्द एकसंघपणा ध्येयकार्य यशस्वी करण्यास प्रेरक ठरतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा