टीम म्हसळा लाईव्ह
पावसाळा सुरू होण्यासाठी साधारण महिन्याभराचा कालावधी असताना श्रीवर्धन नगर परिषदेने शहरातील गटारे खोदण्याकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील पावसाचे पाणी वाहून नेणारा नाला एका जमीनदाराने पूर्णपणे वाळूचा भराव करून बुजवून टाकला आहे. ज्या ठिकाणी हा भराव करण्यात आला आहे, त्या ठिकाणी या नाल्याचे शेवटचे टोक आहे. या नाल्याचे पाणी थेट समुद्राला मिळते. यावर श्रीवर्धन मधील शेतकर्यांनी आवाज उठवून देखील नगरपरिषदेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
श्रीवर्धनमधील नालेसफाई व गटारांची खोदकामे नगरपरिषदेने अद्यापही केलेली नाहीत. चक्रीवादळामध्ये अनेक मोठे वृक्ष पडले. या वृक्षांचे ओंडके देखील अनेक ठिकाणी गटारांमध्ये पडून आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली तर शहरामध्ये पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी कोरोनाची परिस्थिती किंवा लॉकडाऊन असला तरीही स्वच्छतेची कामे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मज्जाव करण्यात आलेला नाही. जमीनदाराने बुजविलेला नाला जर का पुन्हा खोदण्यात आला नाही तर श्रीवर्धन समुद्र किनार्यालगत असलेली भातशेती पूर्णपणे नष्ट होणार आहे. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने तातडीने गटारांची खोदकामे सुरू करावी व सदर जमीनदारानी बुजवलेला नाला खोदुन पाणी जाण्यासाठी वाट तयार करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
Post a Comment